रेडा -भाजप नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी नवी दिल्ली येथे नूतन केंद्रीय मंत्र्यांच्या भेटी घेऊन मंत्रीपदी निवड झाल्याबद्दल अभिनंदन केले. या भेटीत नूतन केंद्रीय मंत्र्यांशी हर्षवर्धन पाटील यांनी विविध विषयांवर चर्चा केली.
नवी दिल्ली येथे बुधवारी व गुरुवारी हर्षवर्धन पाटील यांनी भाजपचे ज्येष्ठ नेते व केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी, माजी मुख्यमंत्री व सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे, माजी प्रदेशाध्यक्ष व रेल्वे,
कोळसा व खाण राज्यमंत्री रावसाहेब दानवे, केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड, केंद्रीय आरोग्य व कुटुंबकल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार या नूतन केंद्रीय मंत्र्यांची भेट घेऊन शुभेच्छा दिल्या यावेळी सर्व नेत्यांशी हर्षवर्धन पाटील यांनी विविध विषयांवर चर्चा केली.
दरम्यान, पालखी मार्गांसाठी भरघोस निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल त्याचबरोबर विविध रस्ते, पूल, भुयारी मार्ग यांच्या कामासाठी मागणी केल्यानंतर तात्काळ निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल पाटील यांनी नितीन गडकरी यांचे आभार मानले.