युवासेनेचा शहरप्रमुख हर्षवर्धन कोतकर खंडणीच्या गुन्ह्यात अटकेत

आणखी दोघांचा समावेश; कांदा व्यापार्‍याकडून 20 हजार उकळले

नगर – नगर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नेप्ती (ता. नगर) येथील कांदा व्यापार्‍याकडून 20 हजार रुपयांची खंडणी उकळल्याच्या आरोपावरुन शिवसेनाचा युवासेनेचा शहरप्रमुख हर्षवर्धन महादेव कोतकर यास पोलिसांनी अटक केली आहे.

कोतकर याच्यासह आणखी तिघा संशयितांचा गुन्ह्यात सहभाग असून, त्यांनाही अटक करण्यात आली असल्याचे पोलिसांनी सांगितले. हर्षवर्धन कोतकर (रा. एकनाथनगर, केडगाव) याच्यासह अक्षय दिलीप कोके (रा. अक्षता गार्डनसमोर, नगर), राजेंद्र गोरख रासकर (रा. चास ता. नगर) यांनाही पोलिसांनी अटक केली आहे. कांदा व्यापारी महेश जवाहरलाल भराडिया (रा. वांबोरी, ता. राहुरी, जि. अहमदनगर) यांनी या संदर्भात नगर तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

जमिनीचा व्यवहार मोडला, म्हणून तुला पैसे द्यावे लागतील, असे म्हणून आरोपींनी फिर्यादीला फोनवरुन धमकावले. तसेच दुकानात येऊन ठार मारण्याची धमकी देत 20 हजार रुपये मागितले. त्यानंतर अक्षय दिलीप कोके व त्याबरोबर एक अनोळखी व्यक्ती यांनी हर्षवर्धन महादेव कोतकर याला फोन लावला होता. त्यानंतर भराडीया यांनी कोके याच्याकडे खंडणीचे पैसे दिले. कोके याने कोतकर याला फोन करून पैसे मिळाल्याचे सांगितले. त्याचवेळी तिथे साध्या वेशात असलेल्या पोलिसांनी कोके व त्यासोबत असलेल्या व्यक्तीला ताब्यात घेत अटक केली. सहायक निरीक्षक राजेंद्र सानप तपास करीत आहेत.

मुख्य सूत्रधार पोलिसांनी शोधावा : संदेश कार्ले
शिवसेनेच्या युवा शाखेचे पदाधिकारी हर्षवर्धन कोतकर यांच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल झाला आहे. अवघ्या 20 हजारांसाठी कोतकर खंडणी मागू शकत नाही. यामागे नक्कीच राजकीय शडयंत्र आहे. त्यामुळे पोलीस प्रशासनाने व्यापारी भराडीया याचे फोन डिटेल्स तपासावे. गेल्या 15 दिवसात कोणत्या राजकीय नेत्याचे वारंवार फोन आले त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी संदेश कार्ले यांनी यावेळी केली.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.