मुंबई : भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचे मामा प्रकाश महाजन आणि कन्नडचे शिवसेनेचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी पुन्हा मनसेची वाट धरली आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या उपस्थितीत “कृष्णकुंज’वर प्रकाश महाजन आणि हर्षवर्धन जाधव यांनी अधिकृत प्रवेश केला आहे.
याचबरोबर शिवसेनेचे गटनेते आणि माजी खासदार चंद्रकांत खैरे यांचे विश्वासू सुहास दशरथे यांनी आणि शिवसेनेचे नांदेडचे माजी जिल्हाप्रमुख प्रकाश कौडगे यांनीही मनसेत प्रवेश केला आहे. प्रकाश महाजन हे भाजपचे दिवंगत दिग्गज नेते प्रमोद महाजन यांचे बंधू आहेत.
“मनसे’ने घुसखोरांविरोधात उद्या मोर्चा काढणार आहे. मुंबई पोलिसांनी त्या मोर्चाला परवानगी नाकारली आहे. फक्त आझाद मैदानात सभा घ्या, असे निर्देश पोलिसांनी दिले आहेत. न्यायालयाच्या निर्देशानुसार दक्षिण मुंबईत मोर्चे काढण्यास मनाई आहे.
संवेदनशील आणि गजबजलेला भाग तसेच अनेक परदेशी दुतावास असल्याने दक्षिण मुंबईत मोर्चाकरता मनाई आहे, असे पोलिसांनी म्हटले आहे. त्यामुळे मनसे आक्रमक होण्याची शक्यता आहे. दरम्यान, मोर्चासाठी येणाऱ्या कार्यकर्त्यांच्या गाड्या पारसी जिमखाना येथे लावून त्यांनी पायी आझाद मैदानला यावे, अशी सूचना पोलिसांनी दिल्या आहेत.