पुणे – ध्रुवतारा फाउंडेशन व पेरिविंकल स्कूलच्या संयुक्त विद्यमाने ऑलिम्पिकवीर खाशाबा जाधव यांची 97 वी जयंती पुण्यात महाराष्ट्र क्रीडा दिन म्हणून साजरी करण्यात आली. या निमित्ताने तिसऱ्या खाशाबा जाधव पुरस्काराने महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगीरचा गौरव करण्यात करण्यात आला.
भारताचे पहिले ऑलिम्पिक पदक विजेते खाशाबा जाधव यांचा जन्मदिन महाराष्ट्रात 15 जानेवारी हा राज्य क्रीडा दिन म्हणून साजरा करण्यात येतो. या निमित्ताने महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगीर यांना अभिनव ग्रुपचे संचालक श्यामकांत शेंडे व विधितज्ज्ञ रवींद्र शिंदे यांच्या हस्ते खाशाबा जाधव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
याप्रसंगी पेरिविंकल स्कूलचे संस्थापक राजेंद्र बांदल, अर्जुन पुरस्कर प्राप्त कबड्डीपटू शांताराम जाधव व क्रीडा लेखक संजय दुधाणे उपस्थित होते. मानचिन्ह, शाल, श्रीफळ, क्रीडा पुस्तके व पंधरा हजार रुपये असे या पुरस्काराचे स्वरूप होते.
यापूर्वी ऑलिम्पिकपटू मनोज पिंगळे, महाराष्ट्र केसरी बालारफिक शेख यांचा खाशाबा जाधव पुरस्काराने गौरव करण्यात आला होता.