पुणे: उत्तर प्रदेश मधील लखनौ येथे नुकत्याच पार पडलेल्या १५ व्या नॅशनल इंनडोअर फिल्ड आर्चरी सिंगल स्पॉट बेअरबो २०२४-२५ स्पर्धेत नांदेड सिटी येथील हर्ष अविनाश लगड याने रौप्य पदक पटकावले आहे. १४ वर्षाखालील गटात हर्षने महाराष्ट्राचे प्रतिनिधीत्व करत हे यश मिळविले. तर या स्पर्धेत सर्वाधिक पदकांना गवसणी घालत महाराष्ट्राचा संघ अव्वल ठरला आहे.
या खेळात जम्मू काश्मिरसह २८ राज्यांचे संघातील १२०० खेळाडू सहभागी झाले होते. त्यात, महाराष्ट्राचे सुमारे १०९ खेळाडू सहभागी झाले होते. विशेष म्हणजे अवघ्या एका वर्षापूर्वी हर्ष याने आर्चरीला या खेळाला सुरूवात केली असून नांदेड सिटी आणि गांधीभवन येथील फोकस अकॅडमीमध्ये त्यांनी आर्चरीचे प्रशिक्षण घेतले.
यासाठी तो रोज दीड तास नियमित सराव करत असून खेळाची आणि सरावातील सातत्याने त्यांने हे यश संपादीत केले असल्याचे हर्षचे वडील अविनाश यांनी सांगितले. हर्षच्या या यशाचे नांंदेड सिटी परिसरातील नागरिक आणि आर्चरीच्या खेळाडूंकडून विशेष कौतूक केले जात आहे.