पुणे – पिंपरी-चिंचवड आणि पुणे शहराला जोडणाऱ्या हॅरिस ब्रीजच्या परिसरात पुणे महापालिकेच्या हद्दीतील बोपोडी येथील तब्बल 63 मिळकती महापालिकेकडून हटविण्यात आल्या यामुळे या ठिकाणी रस्त्याचा असलेला “बॉटल नेक’ अखेर निघाला असल्याने ही दोन्ही शहरांमधील येण्याचा जाण्याचा मार्ग सुपरफास्ट होणार आहे. मागील वर्षीच या रस्त्याच्या रुंदीकरणासाठी लष्कराने जाग दिल्याने खडकी स्टेशन परिसरातील रस्ता रुंदीकरणाचा मार्ग मोकळा झाला होता, त्यानंतर आता ही कारवाई करण्यात आल्याने हॅरीस पूल परिसरातील कोंडीही फुटली आहे. महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांनी ही माहिती दिली.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या हद्दीतील हॅरीस पुलापर्यंतचे पुणे-मुंबई रस्त्याचे रुंदीकरण अनेक वर्षांपूर्वी झाले आहे. परंतु, बोपोडी येथे पुणे महापालिकेच्या हद्दीत रस्ता रुंदीत अडथळा ठरणाऱ्या मिळकतींमुळे येथे बॉटल नेक होऊन बोपडी चौकात वाहतूक कोंडी होत होती. येथील भूसंपादनासाठी प्रशासन 2018 पासून पाठपुरावा करीत होते. मात्र, न्यायालयीन प्रक्रियेमुळे विलंब होत होता.
दरम्यान, प्रशासनाने सर्व कायदेशीर प्रक्रिया पार पाडून आज सकाळी सात वाजताच पोलीस बंदोबस्तामध्ये येथील चौकातील दुमजली इमारतीसह लगतच्या तब्बल 63 मिळकती जमीनदोस्त केल्या. या कारवाईसाठी सहाय्यक पोलीस आयुक्त आरती बनसोडे, पालिकेच्या भूमीप्रापण विभागाच्या उपायुक्त प्रतिभा पाटील, उपअभियंता दिनकर गोजारे, महींद्रकर, औंध क्षेत्रिय कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त खलाटे यांच्यासह 50 अधिकारी, 75 बिगारी आणि 450 पोलीस तैनात करण्यात आले होते. या कारवाईमध्ये तब्बल 4 हजार 600 चौ.मी. जागा ताब्यात घेण्यात आली असून रस्ता रुंदीरकणाचे काम तातडीने सुरू करण्यात येणार आहे. हे काम वेगाने पूर्ण करण्याच्या सूचना आलेल्या आहेत.