सुरीला धार लावून सावरला संसार!

रोजगाराचे मिळाले साधन ः बेरोजगारांसाठी ठरताहेत आदर्श
आनंद भवारी

बोपखेल – सकाळी लवकर उठून डब्बा घेऊन घराबा हेर पडायचं…, वाट फुटेल तिकडे धावायचं…, “सुरी, कैंचीला धार लावून घ्या’ म्हणतं बेंबीच्या देठापासून ओरडायचं…, दिवसभर फिरले की चारशे-पाचशे रुपये मिळतात…, कोणतेही काम छोटे-मोठे नसते…, हाताला काम मिळणे गरजेचे असते, असे जगण्याचे मर्म सांगणारे रामकिसन वाघमारे यांनी सुरीला धार लावत आपला संसार सावरला आहे.

सकाळी उठून आवरलं की पोटात दोन घास घालायचे. आपली सायकल नीटनेटकी आहे का हे पहायचं आणि वाट फुटेल, वस्ती दिसेल तिथपर्यंत जायचं. सुरीला धार लावायची का, असा सूर लावत ग्राहकांचे लक्ष वेधणारे रामकिसन एकनाथ वाघमारे बोपखेल परिसरात कुतूहलाचा विषय बनले आहेत. कैचीसाठी पन्नास तर सुरीसाठी वीस रुपये दर आकारत गल्ली, बोळात त्यांची स्वारी फिरत असते. 55 वर्षीय रामकिसन वाघमारे मूळचे बीडचे आहेत. तिकडे उदरनिर्वाहाचे साधन नसल्यामुळे त्यांनी पिंपरी-चिंचवड गाठले. मात्र, येथेही कामधंदा मिळविण्याचे आव्हान त्यांच्यासमोर होते. त्यात शिक्षण कमी नोकरीच्या आशेने अनेक ठिकाणी उंबरे झिजवले. अखेर सुरीला धार लावून पैसे मिळविण्याचा मार्ग त्यांना सापडला. हा मार्ग त्यांच्यासाठी सुखकर ठरला.

पत्नी, चार मुली, एक मुलगा असा वाघमारे यांचा परिवार वीस वर्षांपासून दिघीतील भाड्याच्या घरात राहतो. कमावणारा एकटा, खाणारी तोंडं सहा; एवढ्यांचे पोट भरणे म्हणजे मोठे आव्हान. तेल आहे तर मीठ नाही, मीठ आहे तर पीठ नाही, असे सुरूवातीचे दिवस ढकलले. पुढे ओळखी वाढत गेल्या आणि व्यवसाय वाढला. मग पोटाला पोटभर मिळू लागले. चार पैसे गाठीशी बांधता आले, असे वाघमारे यांनी सांगितले.

मुलांचे शिक्षण, लग्न झाली. कमी भांडवलात चांगले पैसे मिळवून देणारे हे काम आहे. सायकल असल्याने इंधनाचा खर्च वाचतो. मात्र, दिवसभर दूरवर फिरण्याची ताकद पायात असायला हवी, असे वाघमारे यांनी दैनिक “प्रभात’शी बोलताना सांगितले. कोणत्याही कामाची लाज वाटून घेवू नये, काम आणि चार पैसे मिळणे महत्त्वाचे असतात, असा कानमंत्रही त्यांनी दिला.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.