राखेतून भरारी घेणाऱ्याला नेहमीच फिनीक्स पक्ष्याची उपमा दिली जाते. मात्र, राखेतून यशाच्या आकाशात भरारी घेतल्यानंतरही मातीशी घट्ट नाळ जोडून ठेवताना समाजाशी एकरूप होत आयुष्याला आकार देणाऱ्याला आपण काय म्हणाल? अशावेळी खडतर स्थितीतही उभ्या राहणार हार्मोनी कंपनीत ऍडमिन मॅनेजर या पदावर काम करणारे दीपक मोतीराम चौधरी यांचे नाव समोर येते.
आयुष्यात कितीही मोठी मजल मारली तरी त्या यशाचा पाया रचतना आलेल्या अडचणींची शिदोरी सतत गाठीशी ठेवत जनमानसात रमणारी व्यक्तीमत्त्वं फारच थोडी असतात. आपल्या वाटेला आलेल्या हालअपेष्टा, कष्ट इतरांच्या वाटल्याला येवू नयेत, याकरीता सतत समाजमनाच्या आरशात आपली प्रतिमा पाहून अडीअडचणीत असलेल्यांना विविध पातळीवर मदत करीत राहणाऱ्या व्यक्तींना सलाम करताना सहज हात मस्तकी जातो, असाच सलाम करावासा वाटतो. तो हार्मोनी कंपनीत ऍडमीन मॅनेजर म्हणून काम करणारे दीपक मोतिराम चौधरी यांना.
कुरकुंभ औद्योगिक वसाहतीतील हार्मोनी ऑर्गनिक्स कंपनीत उच्च पदावर काम करीत असतानाही लगतच्या गावपातळीवर अतिशय जिव्हाळ्याचे संबंध प्रस्थापित ठेवून चौधरी यांनी सामाजिक बांधीलकी जपली आहे. कुरकुंभ, पांढरेवाडी, पाटस, दौंड, रावणगाव, खडकी, रोटी, कुसेगाव, केडगाव अशा अनेक गावांत दीपक चौधरी यांचा चांगला जनसंपर्क आहे. या गावात अनेक समाजोपयोगी कामे करण्यावर चौधरी यांच्या माध्यमातून भर दिला गेला आहे. कुरकुंभ येथील श्री फिरंगाईमाता विद्यालयातील पाच विद्यार्थी दत्तक घेत त्यांच्या शिक्षणाचा खर्च करण्याची तयारी त्यांनी दाखविली. यासह विद्यार्थ्यांना वह्या, पुस्तके, बॅग, कपडे असे शालेय साहित्य देण्यातही चौधरी हे नेहमीच पुढे असतात. कुरकुंभ परिसरातील मुकादमवाडीत पाण्याची समस्या जाणवत असताना चौधरी यांनी आई-वडिलांच्या स्मरणार्थ टॅंकरने पाणी पुरविले, येत्या काळात दौंड तालुक्यातील काही शाळांत स्टडी सेंटर संकल्पना राबविण्यात येणार असल्याचे दीपक चौधरी यांनी सांगितले.
हार्मोनी सारख्या मोठ्या कंपनीत चांगल्या पदावर काम करीत असतानीा अशी सामाजिक बांधीलकी कशी जपली जाते, याबाबत चौधरी यांच्याबाबत जाणून घेण्याचा प्रयत्न केला. चौधरी यांचे प्राथमिक शिक्षण आश्रमशाळा पिंपळनेर (ता. साक्री, जि. धुळे) येथे घेतले तर मालेगावच्या माध्यमिक शिक्षण सरस्वती विद्या मंदिर तसेच झुंबरलाल पन्नालाल काकाणी विद्यालयात झाले. शालेय जीवनात त्यांनी कापड दुकान, सोडा वॉटर स्टॉल अशा विविध ठिकाणी काम करीत महाराजा सयाजीराव गायकवाड महाविद्यालयात च्च माध्यमिक शिक्षण पूर्ण केले. सोलापूर येथे त्यांनी हालाखीत दिवस काढले. पेपर विकणे, बाजारात अगरबत्ती तसेच भाजीपाला विकण्याचे काम त्यांनी केले. यातून त्यांना तळागाळातील लोकांच्या समस्येची जाण होत गेली. याच जाणीवेतून सोलापुरात स्वीट वर्ल्ड कंपनीत काम करताना त्यांनी परिसरातील महिलांना रोजगार उपलब्ध करून दिला. प्रयत्नांति परमेश्वर या म्हणी प्रमाणे त्यांच्या राजेश कुलकर्णी या मित्राने दौंड येथे कार्यरत असणारे एक्साईज इन्स्पेक्टर संजय कुलकर्णी यांची ओळख करून दिली, त्यांनी चौधरी यांना कुरकुंभ औद्योगिक वसाहती मधील हार्मोनी ऑर्गनिक्स कंपनीत मुलाखतीसाठी आणले. कंपनीचे एम.डी. रवीकुमार नांगीया यांनी चौधरी यांना एकूण 12 प्रश्न विचारले. त्यातील 11 प्रश्न हे केमिकलच्या संदर्भात विचारले तर 12 वा प्रश्न ‘आप सिखना चाहते हो क्या..? असा विचारल्यानंतर चौधरी यांनी “मी मरेपर्यंत शिकेन’, असे उत्तर दिले आणि याच शब्दावर त्यांची या कंपनीमध्ये निवड झाली. कुरकुंभमध्ये छोटी खोली घेऊन राहण्यास सुरवात केली. 78 तास सलग काम करून कंपनीमध्ये दिवस काढले, त्यावेळी कंपनी छोटी असल्याने प्रत्येक विभागात काम करण्याची त्यांना संधी मिळाली. याच संधीचे सोने करीत त्यांनी प्रत्येक विभागाचा अनुभव घेतला. प्रत्येक विभागात काम केल्याने कंपनी मधील लोकांशी संपर्क वाढला.
(संकलन : विनोद गायकवाड, कुरकुंभ)