अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सर्वच प्रकारच्या नोकऱ्यांसाठीच्या व्हिसांना तात्पुरती बंदी घालण्याचा महत्त्वाचा निर्णय आज घोषित केला आहे. त्यात एच-1बी व्हिसाचाही समावेश आहे. भारतातील आयटी क्षेत्रातील युवकांसाठी या व्हिसामुळे रोजगाराची मोठी संधी तेथे उपलब्ध होत होती. ट्रम्प यांच्या निर्णयामुळे अमेरिकेत जाऊन चांगल्या पगाराची नोकरी मिळवण्याच्या भारतीय युवकांच्या स्वप्नांना सध्या तरी लगाम बसणार आहे. त्यामुळे ट्रम्प यांचा निर्णय भारतासाठी हानिकारक ठरणार आहे.
अर्थात, ही बंदी या वर्षाच्या अखेरीपर्यंत आहे. त्यानंतर नवीन सुधारणांसह व्हिसा पद्धत लागू होईल. सध्या अमेरिकेत निवडणुकीचे वातावरण आहे. तेथील जनतेला खूश करण्यासाठी राष्ट्राध्यक्षांकडून असे उथळ लोकप्रियतेचे निर्णय घेतले जाणे अपेक्षितच होते. ट्रम्प हे स्वत:ही याचे संकेत गेले काही दिवस देत होते. त्यांना अमेरिकेतील बेकारी दूर करायची आहे. तेथील बेकारीचे प्रमाण 13.5 टक्क्यांवर गेले आहे.
अमेरिकेतील युवकाची नोकरी एच-1बी अथवा अन्य प्रकाराच्या नोकरीच्या व्हिसावर अमेरिकेत येणाऱ्या विदेशी युवकाने पळवू नये म्हणून आम्हाला हा निर्णय घ्यावा लागत आहे, असे ट्रम्प यांनी म्हटले आहे. ट्रम्प यांच्या निर्णयामुळे देशातील बेरोजगार युवक खूश होतील आणि त्याचा नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या निवडणुकीत आपल्याला लाभ होईल, अशी त्यांची अटकळ आहे.
तथापि, ट्रम्प यांच्या या निर्णयावर तेथील उद्योगजगतानेच नाराजी व्यक्त करायला सुरुवात केली आहे. ट्रम्प यांच्या या निर्णयाचा अमेरिकेतील अर्थकारणालाच मोठा फटका बसेल, असे त्या क्षेत्रातील लोकांचे म्हणणे आहे. अमेरिकेतील लोकांना नोकरी देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला असला तरी उद्योग क्षेत्राला जे टॅलेंट लागते किंवा जे कुशल मनुष्यबळ लागते तेच मिळणे दुरापास्त झाले तर अर्थकारण पुढे कसे नेणार, असा तेथील उद्योगक्षेत्राचा सवाल आहे. पण ट्रम्प यांना प्रत्यक्ष व्यवहाराशी फारसे देणेघेणे नाही. मी अमेरिकेतील बेरोजगारांसाठी काही तरी धाडसी निर्णय घेतो आहे, असे त्यांना दाखवायचे आहे. पण अशा स्वरूपाच्या निर्णयाचे स्वत:च्याच देशातील कंपन्यांची मोठी अडचण होणार आहे याची त्यांना फिकीर नाही.
अमेरिकेतील विविध आंतरराष्ट्रीय कंपन्यांची कुशल मनुष्यबळाची गरज एकट्या अमेरिकेतील बेरोजगार युवकांकडून पुरी होईल याची खात्री कोणालाच नाही. आधीच करोनामुळे अमेरिकेतील अर्थकारण धोक्यात आले आहे. ट्रम्प यांनी पॅकेज वगैरे देऊन ते कसेबसे टिकवून ठेवले असले तरी तेवढ्याने या कंपन्यांची गरज भागणार नाही. त्यांना व्यवसाय वृद्धीसाठी आणि सध्याचे ऑपरेशन सुरू ठेवण्यासाठी लागणारे कुशल मनुष्यबळच अशा निर्णयामुळे रोखले जाणार असेल तर त्याचा फटका या कंपन्यांना बसल्याशिवाय राहणार नाही.
अमेरिकेतर्फे विविध वर्गवारीत व्हिसा जारी केले जातात. त्यात कुशल तंत्रज्ञानावर आधारित नोकऱ्यांसाठीचे व्हिसा जसे असतात तसेच तेथील शेतात मजुरी आणि फॅक्टरी, कंपन्यांमध्ये अकुशल काम करणाऱ्यांसाठीचेही वेगळे व्हिसा प्रकार असतात. ट्रम्प महाशयांनी या वर्षाच्या अखेरीपर्यंत तरी या सर्वच प्रकाराच्या नोकऱ्यांसाठीच्या व्हिसावर बंदी घातली आहे. केवळ अन्नप्रकिया उद्योगांत काम करू इच्छिणाऱ्यांसाठीचे व्हिसा त्यांनी खुले ठेवले आहेत.
त्यांच्या या निर्णयामुळे अमेरिकेतील साऱ्याच क्षेत्रातील कंपन्यांची कुचंबणा होण्याचा धोका आहे. जोपर्यंत सर्व बेरोजगार अमेरिकन युवक नोकऱ्यांमध्ये सामावून घेतले जाणार नाहीत तोपर्यंत व्हिसा खुले न करण्याचे त्यांचे धोरण असावे. या वर्षाच्या अखेरीनंतर एच-1बी व्हिसा खुला करण्याचा त्यांचा विचार असला तरी त्यातही त्यांनी बऱ्याच गमतीजमती करून ठेवण्याचे संकेत दिले आहेत. पूर्वी या व्हिसासाठी तेथे लॉटरी सिस्टिम लागू असायची, आता ही सिस्टिम बंद करून वेतन पॅकेजच्या प्रमाणात व्हिसा जारी करण्याचा ट्रम्प यांचा मनोदय आहे.
अमेरिकेतील कंपन्यांनी स्थानिक युवकांना डावलून विदेशातून स्वस्तात मनुष्यबळ अमेरिकेत आणू नये या हेतूने ते हा बदल करीत आहेत. कंपन्यांनी स्थानिक लोकांनाच अधिकाधिक संधी देण्याची जणू त्यांनी यानिमित्ताने सक्तीच चालवली आहे. त्यामुळे आपल्या कंपनीत कोणाला कामावर ठेवायचे आणि कोणाला नाही याचा निर्णय ट्रम्प यांच्या मर्जीवर अवलंबून ठेवणे तेथील कंपनी प्रमुखांना रूचलेले नाही.
ट्विटर आणि ऍमेझॉन या कंपन्यांच्या प्रमुखांनी राष्ट्राध्यक्षांच्या या निर्णयात दूरदृष्टीचा अभाव आहे, अशी परखड प्रतिक्रिया दिली आहे. विदेशातून येणाऱ्या कुशल मनुष्यबळाच्या आधारेच अमेरिकेतील आर्थिक मंदीच्या वातावरणात मात करता येऊ शकते, असे त्यांनी म्हटले आहे. पण माझा हा निर्णय अत्यंत दूरदृष्टीचाच आहे, असे ट्रम्प यांनी त्यांच्या आवडत्या फॉक्स न्यूज वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे. हा कॉमनसेन्स आहे, अमेरिकेत रोजगारासाठी येणाऱ्या लोकांचे व्हिसा थांबवल्याशिवाय मी माझ्या देशातील युवकांना रोजगार देऊ शकत नाही, असेही ट्रम्प म्हणाले आहेत.
माझ्या निर्णयामुळे अमेरिकेतील युवक खूश होतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे. सध्या केवळ मतदार खूश झाला पाहिजे, कंपन्यांच्या अर्थकारणाचे नंतर बघता येईल, असा त्यांचा सारा रोख दिसतो आहे. त्यांना येनकेनप्रकारे निवडणूक जिंकायची आहे. त्यासाठी त्यांनी चालवलेले हे चाळे एवढ्यावरच थांबण्याची शक्यता नाही, अशी तेथील लोकांची प्रतिक्रिया आहे. ट्रम्प यांना ही निवडणूक बऱ्यापैकी अवघड होऊन बसली आहे.
त्यांचे प्रतिस्पधी जो बिडेन यांनी त्यांच्यावर जनमत चाचण्यांमध्ये मोठीच आघाडी घेतल्याचे निष्कर्ष अलीकडेच प्रसारित झाल्याने ट्रम्प यांचा तिळपापड होणे स्वाभाविक आहे. त्यांनी नुकताच आपल्या प्रचारसभांचाही धडाका सुरू केला आहे, पण त्यांच्या पहिल्याच सभेला कमी प्रतिसाद मिळाल्यामुळे त्यांनी खडबडून जागे होत “अमेरिका फर्स्ट’चा नारा अशा रीतीने पुन्हा बुलंद करायचे ठरवले आहे. परिणामांची तमा न बाळगता आपल्या अंगी खूप धाडसी निर्णय घेण्याचे गुण आहेत हे जनतेच्या मनावर बिंबवण्याचे त्यांचे हे प्रयत्न आहेत. त्यांचे राजकारण त्यांना लखलाभ पण त्यांच्या अशा स्वरूपाच्या विक्षिप्त निर्णयाचा फटका भारतासारख्या देशातील तंत्रज्ञान कुशल लोकांनाही बसणार आहे, हे मात्र भारतासाठी चिंताजनक आहे.