महिला आयपीएल स्पर्धेत संघांची संख्या वाढवायला हवी -हरमनप्रीत कौर

सुपरनोव्हाजच्या विजयानंतर कर्णधार हरमनप्रीतने व्यक्त केली भावना

ही गोष्ट माझ्या फायद्याची

या सामन्यात मी संघाचा विजय निश्‍चिय होईपर्यंत खेळपट्टीवर होते. त्यामुळे मला अखेरपर्यंत खेळपट्टीवर टिकून खेळत संघाला विजय मिळवून देण्याची शैली शिकता आली. तुम्ही दरवेळी चौकार आणि षटकार खेचू शकत नाही आणि हा उपाय देखील प्रत्येकवेळी कामी येईल असेही नाही, त्यामुळे ही गोष्ट माझ्या दृष्टीने फायद्याची असल्याचे तिने नमूद केले.

जयपूर – पुरुषांसाठी होणाऱ्या इंडियन प्रिमियर लिगच्या धर्तीवर महिलांसाठी देखील अशाच प्रकारची स्पर्धा यंदा बीसीसीआयने आयोजित केली होती. या स्पर्धेचे विजेतेपद हरमनप्रित कौरचा संघ सुपरनोव्हाजने मिताली राजच्या व्हेलॉसिटीचा पराभव करत पटकावले.

यावेळी सामन्यानंतर बोलताना हरमनप्रित कौर म्हणाली की, महिलांसाठीच्या आयपीएल स्पर्धेचे आयोजन करणे हे बीसीसीआयने घेतलेले एक चांगले पाऊल असून आगामी काळात या स्पर्धेमध्ये सहभागी होणाऱ्या संघांची संख्या तीन वरुन वाढवली जाईल अशी आशा व्यक्त करते.

यावेळी, कर्णधार हरमनप्रीत कौरचे झुंजार अर्धशतक आणि राधा यादवने अखेरच्या षटकात केलेल्या उपयुक्त फटकेबाजीच्या जोरावर सुपरनोव्हाज संघाने महिलांच्या ट्‌वेन्टी-20 चॅलेंज क्रिकेट लीगमध्ये व्हेलॉसिटीवर चार गडी राखून रोमहर्षक विजयाची नोंद केली. सुपरनोव्हाजचे हे दुसरे विजेतेपद ठरले आहे. वास्तविक पहाता हे स्पर्धेचे पहिले वर्ष असले तरी गतवर्षी सुपरनोव्हाज आणि स्मृती मंधनाच्या ट्रेलब्लेझर्स दरम्यान एक सामना खेळवला गेला होता. तो सामना देखील हरमनप्रितच्या सुपरनोव्हाजने जिंकला होता.

यावेळी सलग दुसरे विजेतेपद पटकावल्यानंतर बोलताना हरमनप्रित म्हणाली की, महिलांसाठी अशा प्रकारच्या स्पर्धा आयोजित केल्या जाणे हे आमच्यासाठी चांगली गोष्ट असून महिला क्रिकेट आता व्यवसायिकतेकडे वळत असल्याचे हे लक्षन असून यंदाच्या मोसमात मला भरपूर काही शिकायला मिळाले आहे.

भारतात महिलांसाठी टी-20 लीग आयोजित केली जाणे ही चांगली गोष्ट असून आम्ही त्यासाठी खुप उत्सूक होतो आणि ही स्पर्धा देखील भरपूर उत्साहात पार पडली. तसेच अंतिम सामन्यास जवळपास 15000 लोक हा सामना पहाण्यास उपस्थित होते हे पाहूण आमच्यात वेगळाच उत्साह संचारला होता असेही तीने यावेळी सांगितले.

तसेच पुढे बोलताना हरमनप्रीत म्हणाली की, मागिल वर्षी प्रायोगिक तत्त्वावर एक सामना घेतला गेला. तेव्हा केवळ दोन संघ या स्पर्धेत उतरलेले होते. तोच प्रयोग पुन्हा यंदाच्या मोसमात बीसीसीआयने केला ज्यात तीन संघ सहभागी झाले होते.
आगामी काळात या स्पर्धेत आणखीन संघ सहभागी व्हायला हवेत अशी आशा मी व्यक्त करते. जेणेकरून या स्पर्धा उत्कंठावर्धक होतील. तसेच या सर्धा भारतातीलच नाही तर परदेशी महिला खेळाडूंसाठी देखील महत्त्वपूर्ण असल्याचे या स्पर्धेतून समोर आले. कारण अनेक विदेशी खेळाडूंनी आम्हाला या स्पर्धेमध्ये सहभागी व्हायचे आहे असे आमच्याजवळ बोलून दाखवले आहे. त्यामुळे अशा स्पर्धांसाठी संघांची संख़्या देखील तितकीच जास्त असायला हवी जेणेकरून महिला क्रिकेटचा स्तर देखील उंचावला जाऊ शकेल.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.