नवी दिल्ली : जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर येथे होत असलेल्या आयसीसी टी-20 महिला विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत सहा वेळच विजेता ऑस्ट्रेलिया बाजी मारणार की, (वर्ष 1983 प्रमाणे) प्रथमच अंतिम फेरीत पोहोचलेला भारत आश्चर्यकारक कामगिरी करणार, याकडे संपूर्ण क्रीडा विश्वाचे लक्ष लागून राहिले आहे.
भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौर आणि ऑस्ट्रेलियन कर्णधार मेग लॅनिंग या दोघींनीही “आपलाच संघ चषक उंचावणार’ असा अत्मविश्वास व्यक्त केला असला तरी प्रत्यक्ष मैदानावर काय घडते, यालाच सर्वाधिक महत्त्व असेल.
दरम्यान, कपिलदेव यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने वर्ष 1983 पहिल्यांदा विश्वचषक जिंकला होता. त्यावेळी अंतिम फेरीत भारतापुढे आव्हान होते ते पहिल्या दोन्ही विश्वचषक स्पर्धा जिंकलेल्या वेस्ट इंडिजचे. पण त्यावेळी सर्वांनाच धक्का देत भारताने हा विश्वचषक जिंकला होता.
भारत-ऑस्ट्रेलिया महिला टी-20च्या अंतिम सामन्यात सध्याच्या घडीला देखील अशीच परिस्थिती आहे. वर्ष 1983 या विश्वचषकाच्या अंतिम फेरीत बलाढ्य वेस्ट इंडिजला नमवण्यापूर्वी त्याच स्पर्धेच्या साखळी फेरीतही भारताने वेस्ट इंडिजवर 34 धावांनी मात केली होती.
त्यामुळे पहिल्या आणि अंतिम फेरीत भारताने वेस्ट इंडिजवर मात केली होती. या सामन्यातही तशीच परिस्थिती निर्माण झाल्याने, हरमनप्रीत कौर “आणखी एक “कपिल देव ठरणार का?’ अशी उत्सुकता निर्माण झाली आहे.