चंडीगढ : हरियाणा विधानसभा निवडणुकीसाठी तिकीट वाटप केल्यानंतर सत्तारूढ भाजप आणि प्रमुख विरोधी पक्ष कॉंग्रेसला असंतोषाची लागण झाली आहे. उमेदवारी नाकारण्यात आल्याने दोन्ही पक्षांचे अनेक नेते नाराज झाले आहेत. त्यातून दोन्ही पक्षांपुढे बंडखोरीचे आव्हान उभे राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
हरियाणात विधानसभेच्या एकूण 90 जागा आहेत. भाजप आणि कॉंग्रेसने सर्व जागांवरील उमेदवार जाहीर केले आहेत. भाजपने विद्यमान 48 पैकी 12 आमदारांना तिकीट नाकारले. त्यात 2 मंत्र्यांचाही समावेश आहे. भारतीय राष्ट्रीय लोकदलातून (आयएनएलडी) दाखल झालेल्या बहुतांश आयारामांना भाजपने उमेदवारी दिली आहे. त्यामुळे भाजपचे इच्छूक नाराज झाले आहेत. त्यातून काहींनी बंडखोरीचा इशारा दिला आहे. भाजपमधील संभाव्य बंडखोरी थोपवण्यासाठी मुख्यमंत्री एम.एल.खट्टर यांना धावपळ करावी लागत आहे. निवडणूक संपल्यानंतर नाराजांच्या हितरक्षणासाठी पाऊले उचलली जातील, अशी ग्वाही त्यांना द्यावी लागत आहे.
कॉंग्रेसलाही बंडखोरी आणि गटबाजीने ग्रासले आहे. माजी प्रदेशाध्यक्ष अशोक तंवर आणि त्यांच्या समर्थकांनी बुधवारी थेट दिल्लीला धडक मारली. त्यांनी तिकीट वाटपात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या निवासस्थानासमोर निदर्शने केली. त्या निदर्शनांच्या निशाण्यावर हरियाणातील कॉंग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री भुपिंदरसिंह हुडा होते. तेवढ्यावरच न थांबता तंवर यांनी गुरूवारी आणखी आक्रमक पवित्रा स्वीकारला. त्यांनी पक्षाच्या सर्व निवडणूक समित्यांचा राजीनामा दिला. हरियाणा कॉंग्रेस म्हणजे हुडा कॉंग्रेस बनली आहे, असा आरोप त्यांनी केला.