fbpx

कुलभूषण जाधव यांचा खटला लढणारे हरिश साळवे दुसऱ्यांदा बांधणार लग्नगाठ

नवी दिल्ली : पाकिस्तानच्या कारागृहात कैद असणाऱ्या कुलभूषण जाधव यांचा खटला लढणार प्रसिद्ध वकील हरिश साळवे दुसऱ्यांदा लग्नगाठ बांधणार असल्याचे सांगण्यात येत आहे. ३८ वर्षांच्या वैवाहिक आयुष्यानंतर पहिल्या पत्नीसोबत घटस्फोट घेतल्यानंतर साळवे वेगळे झाले होते. वयाच्या ६५ व्या वर्षी साळवे आता दुसरा विवाह करत आहेत.

हरीश साळवे यांच्या पहिल्या पत्नीचे नाव मीनाक्षी असून त्यांना दोन मुलीही आहेत. हरीश साळवे २८ ऑक्टोबरला लंडनच्या चर्चमध्ये त्यांची मैत्रीण कॅरोलिन ब्रॉसार्डशी लग्न करणार आहेत. या दोघांचेही हे दुसरे लग्न आहे. हरिश साळवे यांनीही धर्म परिवर्तन केले असून, त्यांनी ख्रिश्चन धर्म स्वीकारला आहे.

हरिश साळवे यांचे गेल्या दोन वर्षांपासून कॅरोलीन यांच्याशी मैत्रीचे संबंध आहेत. उत्तर लंडनमधील चर्चमध्ये ते नियमितपणे जात असत. साळवे आणि कॅरोलिन या दोघांचं हे दुसरं लग्न असून, या दोघांनाही मुले आहेत. ५६ वर्षीय कॅरोलिन या व्यवसायाने एक कलाकार आहेत. त्यांना एक मुलगीही आहे. एका कला प्रदर्शनात हरीश साळवे यांची कॅरोलिनशी भेट झाली होती. त्यानंतर या दोघांमधील भेटी हळूहळू वाढल्या आणि नंतर घट्ट मैत्री झाली.

घटस्फोटानंतर साळवे हे मुलांपासून दूर लंडनमध्ये कॅरोलीन सोबत रहात आहेत. दोघांमधील समंजसपणाने त्यांचे संबंध पुढे गेले आणि आता सोबत राहण्याचा त्यांनी निर्णय घेतला आहे. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश शरद बोबडे आणि हरीश साळवे या दोघांचंही शिक्षण एकाच शाळेत झालेलं आहे. दोघांनीही महाराष्ट्रातील नागपूर शहरात शिक्षण घेतले. १९७६ मध्ये साळवे दिल्लीत गेले आणि बोबडे मुंबई उच्च न्यायालयात रुजू झाले. नंतर बोबडे हे उच्च न्यायालयाचे न्यायाधीश आणि साळवे वरिष्ठ वकील आणि त्यानंतर सॉलिसिटर जनरल बनले. हरीश साळवे हे सुरुवातीपासूनच त्यांच्या कौशल्यामुळे प्रसिद्ध वकील आहेत. त्यांना भारत सरकारने सॉलिसिटर जनरल म्हणून नियुक्त केले होते. कुलभूषण जाधव यांच्या खटल्यासह इतर अनेक आंतरराष्ट्रीय प्रकरणांमध्ये साळवे यांनी भारत सरकारची बाजू मांडलेली आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.