नवी दिल्ली – प्राथमिक फेरीत नवव्या क्रमांकावर समाधान मानावे लागल्यामुळे चॅम्पियन्स बुद्धिबळ टूर एअरथिंग्ज मास्टर्स ऑनलाइन स्पर्धेतील भारतीय ग्रॅंडमास्टर पी. हरिकृष्णचे आव्हान संपुष्टात आले आहे.
हरिकृष्णने 10 सामने बरोबरीत सोडवले, तर एक पराभव स्वीकारला. त्यामुळे त्याच्या खात्यावर फक्त पाच गुण जमा झाले. मॅक्सिम व्हॅचिअर-लॅग्रेव्ह (फ्रान्स) व डॅनिल दुबोव्ह (रशिया) यांच्या खात्यावरही तितकेच गुण जमा झाले होते. मात्र, एकाही विजयाची नोंद न करता आल्यामुळे हरिकृष्णा अपयशी ठरला. या स्पर्धेतील अव्वल आठ जणांनी बाद फेरी गाठली.
भारताचा द्वितीय क्रमांकावरील बुद्धिबळपटू हरिकृष्णने नवव्या, 10 व्या आणि 11 व्या डावात अनुक्रमे मेलेव्ह अरोनियन, वेस्ले सो आणि टिमॉर रॅडजाबोव्हशी बरोबरी केली. त्याने या स्पर्धेत जागतिक क्रमवारीतील अव्वल स्थानावरील मॅग्नस कार्लसनला बरोबरीत रोखून जाणकारांचे लक्ष वेधले होते.