कष्टाने पिकविलेला ऊस महामार्गावर

गाळपापूर्वीच एक टनांचा घाटा : ऊस उत्पादक शेतकरी संतापला

पळसदेव- इंदापूर तालुक्‍यासह संपूर्ण महाराष्ट्रात विविध जिल्ह्यात सध्या साखर कारखाने सुरू आहेत. साखर कारखान्याला लागणाऱ्या उसाची वाहतूक ट्रक,टॅक्‍टर व बैलगाडीने होत आहे. मात्र अनेकवेळा ट्रॅक्‍टर अथवा इतर वाहनांतून ऊस वाहतूक होत आहे. ऊस तोडणी कामगार ऊस ट्रेलरमध्ये व्यवस्थित भरत नसल्याने उसाची वाहतूक करताना ऊस रस्त्यावर पडत आहे. काबाडकष्ट करून पिकविलेला ऊस वाहतूक करणाऱ्या चालकांमुळे त्याचे महामार्गावर चिपाड होत आहे. यामध्ये शेतकयांचे आर्थिक नुकसान होत आहे.

अनेकवेळा ऊस तोडणी कामगार ट्रेलरमध्ये ऊस व्यवस्थित भरत नाहीत. भरल्यानंतर देखील योग्य पद्धतीने बांधला जात नाही. शेतकऱ्याच्या बांधापासून साखर कारखान्याला गाळपासाठी पोहचेपर्यंत मोठ्या प्रमाणात उसाची मोळ्या रस्त्यावर पडलेल्या दिसत आहे. यामध्ये ऊस रस्त्यावर पडल्यामुळे अनेकवेळा अपघात झाले आहेत. साखर कारखाने सुरू असतात. त्यादरम्यान रस्त्यावर अपघाताचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे. विशेषतः दुचाकी व कारगाड्यांचा अपघात मोठ्या प्रमाणात होत आहे. विशेष बाब म्हणजे ऊस शक्‍यतो रस्त्याचा उताराच्या व चढणीच्या भागात जास्त पडलेला दिसत आहे. नेमके याच भागात गाड्याचा वेग अधिक असल्याने अपघातांची मालिका घडत आहे. ट्रेलरमधून ऊस पडला तरी टॅक्‍टर चालक तसाच सोडून निघून जात आहेत. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्याचे नुकसान होत आहे. सोबतच अपघात होऊन प्रवाशांना नाहक जीव गमवावा लागत आहे. तरी साखर कारखानदारांनी ट्रॅक्‍टर चालकांना तातडीने सक्‍त सूचना देण्यात याव्यात, जाणीवपूर्वक शेतकऱ्यांचे नुकसान करणाऱ्या वाहन मालकांवर कारवाई करावी, अशी मागणी ऊस उत्पादक शेतकरी करीत आहे.

  • दुष्काळाने मारले अन्‌ चालकांने टाकले
    एकतर दुष्काळामुळे उसाचे प्रमाण कमी आहे. शिल्लक राहिलेला काही टक्‍के ऊस चारा छावणी व गुऱ्हाळाकडे गेला आहे. त्यामुळे इंदापूर आणि बारामती तालुक्‍यातील ऊस मोठ्या प्रमाणात संपला आहे. सध्या काही कारखाने पूर्ण क्षमतेने सुरू नाही. याला ऊसघटीचे कारण ठरले आहे. त्यातच परत उसाचे अशा प्रकारे नुकसान करून ऊस तोडणी कामगार, वाहतूकदार व कारखानदार यांचे नुकसान होत आहे. यामध्ये शेतकऱ्याचे नुकसान जादा होत असल्याने शेतकरी संतापला आहे. हलगर्जीपणा करणाऱ्या ऊस तोडणी कामगारांवर व वाहतूक करणाऱ्या टॅक्‍टर मालकावर तातडीने कारवाई करण्यासाठी कारखाना प्रशासनाकडे शेतकरी दाद मागणार आहे.
  • पोटाला चिमटा काढून ऊस पिकविला
    इंदापूर तालुक्‍यात यंदा दुष्काळाने ऊस उत्पादक शेतकरी घाट्यात आला आहे. उन्हाळ्यात पाणीबचत करून प्रसंगी टॅंकरने पाणी आणून ऊस जगविला आहे. शेतकऱ्यांनी ऐन दुष्काळात रक्‍ताचे पाणी करून व रात्रीचा दिवस करून उसाला पोटच्या पोरासारखा जपलं आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी दिली आहे. आता ऊस तोडणी करताना मजूर आणि वाहतूक करणारे चालक यांच्या हलगर्जीपणामुळे बळीराजाला आर्थिक झळ सोसावी लागत आहे. हा प्रकार तातडीने थांबविण्यासाठी कारखान्याने भरारी पथकांची नेमणूक करावी, अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे.
Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)