मनिला, (फिलीपाईन्स) – फिलीपाईन्समधील कट्टर कम्युनिस्ट बंडखोर आणि आशिया खंडातील कसर्वात मोठ्या घुसखोर संघटनेचा म्होरक्या जॉर्ज मॅडलोस फिलीपाईन्समधील दक्षिणेकडील घनदाट जंगलात झालेल्या चकमकीत ठार झाला.
फिलीपाईन्सच्या सैन्याने केलेल्या धडक मोहिमेत हा बंडखोर ठार झाला. मात्र प्रत्यक्षात या ठिकाणी सैन्याची कारवाई झाली नसून मोठी चकमक झाल्याचे बंडखोरांच्या वतीने सांगण्यात आले.
जॉर्ज मॅडलोस हा गेल्या काही दशकांपासून फिलीपाईन्सच्या दक्षिणेकडील जंगलांमध्ये कम्युनिस्ट बंडखोरांचे नेतृत्व करत होता. बुकिडनॉन प्रांतात शनिवारी डॉर्ज मॅडलोस याला सरकारी फौजांनी ठार मारले आहे, असे संरक्षण सचिव डेल्फिन लॉरेन्झाना यांनी सांगितले. मॅडलोस याला ठार मारल्यामुळे आता न्यू पीपल्स आर्मी या बंडखोरांच्या गटाला मोठा हादरा बसला असल्याचेही त्यांनी सांगितले.
जंगलामध्ये सुमारे 30 बंडखोर असल्याची माहिती स्थानिक गावकऱ्यांनी सैन्याला दिली होती. या ठिकाणी हे बंडखोर काही खलबते करत होते. या ठिकाणी सैन्याच्या लढाऊ विमानांनी प्रथम रॉकेट हल्ले केले. त्यामध्ये बंडखोरांचे भुसुरुंग उडवून देण्यात आले. त्यानंतर तासभर चाललेल्या चकमकीमध्ये मॅडलोस आणि त्याचे सहकारी मारले गेले.
मॅडलोस याने बंडखोरांच्या गटांसह फिलीपाईन्समध्ये अनेक घातपाती कारवाया घडवून आणल्या होत्या. दीर्घ काळ चाललेल्या संघर्षात त्याच्या गटाला मोठे हादरे बसले होते. मात्र केवळ 3 ते 4 हजार बंडखोरांसह त्याने आपला संघर्ष सुरूच ठेवला होता.