उपमुख्यमंत्र्यांचा आयुक्तांना सल्ला : तूर्तास तरी बदलीची शक्यता मावळली
पिंपरी – पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर हे गेली साडेतीन वर्ष पिंपरी चिंचवड महापालिकेच्या आयुक्त पदावर आहे. भाजपधार्जिणे धोरण घेत असल्याची टीका नेहमीच पालिकेतील विरोधी पक्ष आयुक्तांवर करत होते.
राज्यातील सत्ता बदलानंतर आयुक्तांची तात्काळ बदली निश्चित असल्याच्या अनेक अफवा या दरम्यान उठल्या. परंतु आता थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडूनच हर्डीकर तुम्ही काम करत रहा, असा सल्ला देत एकप्रकारे पाठराखणच केली आहे. यामुळे आता विरोधी पक्षाच्या नगरसेवकांना आयुक्तांविरुद्धची आपली भूमिका काहीशी सौम्य करावी लागणार असल्याची चिन्हे दिसत आहेत.
महापालिकेमध्ये साडेतीन वर्षापूर्वी आयुक्त हर्डीकर यांची नियुक्ती झाली. तेव्हापासून विरोधी पक्षाने सत्ताधाऱ्यांच्या बाजूने आयुक्त निर्णय घेत असल्याची टीका केली.
तीन वर्ष पूर्ण झाल्यानंतर आयुक्तांची बदलीची चर्चा महापालिकेत सतत घुमत राहिली. मात्र तेव्हा आयुक्तांची बदली झाली नाही. त्याच कालावधीत राज्यात सत्तांतर होऊन महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले. सत्ता बदल झाल्यानंतर महापालिकेतील विरोधी पक्षाच्या आशा पल्लवित झाल्या.
कारभारी आणि आयुक्तांमध्ये शीतयुद्ध
राज्यातील सत्ता बदलल्यानंतर आयुक्त हर्डीकर यांची बदली होईल, असे महापालिकेतील सत्ताधारी पक्षालाही वाटत होते. मात्र सत्तांतरानंतरही आयुक्तांची बदली झाली नाही. पण राज्यातील सत्ता बदलल्यापासून पालिकेचे कारभारी आणि आयुक्तांमध्ये शीतयुद्ध सुरू झाले. तीन वर्ष पालिकेतील सत्ताधारी भाजप आणि प्रशासन यांच्यामध्ये गुण्यागोविंदाने सुरू असलेल्या कारभारावर आता भाजपच्याच आमदारांनी प्रश्नचिन्ह उपस्थित करायला सुरूवात केली. त्यातून चिंचवडचे आमदार यांनी आयुक्तांना विविध पत्रे धाडली.