हार्दिक पटेल यांच्यावर कॉंग्रेसने सोपवली मोठी जबाबदारी

गुजरातमध्ये पक्षाचे कार्याध्यक्षपद सांभाळणार

नवी दिल्ली – गुजरातमधील पाटीदार समाजाचे तरूण नेते हार्दिक पटेल यांच्यावर कॉंग्रेसने मोठी जबाबदारी सोपवली आहे. त्यांना पक्षाचे प्रदेश कार्याध्यक्ष बनवण्यात आले आहे.

कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी 26 वर्षीय हार्दिक यांच्या नियुक्तीला मंजुरी दिली. गुजरातमधील पाटीदार समाजाबरोबरच तरूणांना कॉंग्रेसकडे आकर्षित करण्याची रणनीती म्हणून त्या नियुक्तीकडे पाहिले जात आहे. गुजरातमध्ये काही वर्षांपूर्वी आरक्षणाच्या मागणीसाठी पाटीदार समाजाने तीव्र आंदोलन केले. त्या आंदोलनाचा चेहरा हार्दिक ठरले. गुजरातमध्ये भाजप सरकारशी संघर्षाची भूमिका घेतल्यामुळे अतिशय कमी वयात त्यांना देशभर प्रसिद्धी मिळाली.

कॉंग्रेसने त्यांना हेरून आपल्याबरोबर घेतले. मागील वर्षीच्या लोकसभा निवडणुकीआधी हार्दिक यांनी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. मात्र, ते स्वत: निवडणुकीच्या रिंगणात उतरले नाहीत. मागील काही काळापासून ते फारशा प्रसिद्धीझोतात नव्हते. आता कॉंग्रेसने मोठी जबाबदारी सोपवल्याने हार्दिक राजकारणात अधिक सक्रिय होतील, असे मानले जात आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.