आता दुसऱ्या प्रकरणात कारवाई
अहमदाबाद : गुजरातमधील कॉंग्रेस नेते हार्दिक पटेल यांना गुरूवारी तुरूंगातून बाहेर पडताच पुन्हा अटक करण्यात आली. ती कारवाई गांधीनगर पोलिसांनी केली. पाटीदार समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी झालेल्या आंदोलनाचे नेतृत्व केल्याने हार्दिक काही वर्षांपूर्वी प्रसिद्धीझोतात आले. त्या आंदोलनादरम्यान 2015 मध्ये एका सभेवेळी हिंसाचार झाला.
त्यावरून हार्दिक यांच्या विरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला. त्या प्रकरणाशी संबंधित सुनावणीसाठी न्यायालयात हजर न राहिल्याने त्यांना 18 जानेवारीला अहमदाबाद पोलिसांनी अटक केली. त्यानंतर बुधवारी हार्दिक यांना जामीन मंजूर करण्यात आला. त्यामुळे ते गुरूवारी साबरमती मध्यवर्ती कारागृहातून बाहेर आले.
मात्र, तुरूंगाबाहेर पडताच त्यांना गांधीनगर पोलिसांनी अटक केली. पोलिसांच्या परवानगीविना 2017 मध्ये सभा घेतल्याबद्दल ती कारवाई करण्यात आली. त्यामुळे सहा दिवसांच्या अंतरात त्यांना दुसऱ्यांदा अटक झाली. हार्दिक यांनी मागील वर्षीच्या लोकसभा निवडणुकीआधी कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला.