गुजरातच्या उपमुख्यमंत्री नितीन पटेल यांची टिप्पणी
अहमदाबाद – कॉंग्रेस नेता हार्दिक पटेलला झालेली अटक ही कोर्टाच्या आदेशावरूनच झाली आहे, हे कॉंग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी वढेरा यांना माहित असायला हवे, अशी टिप्पणी गुजरातचे उपमुख्यमंत्री नितीन पटेल यांनी केली आहे. हार्दिक पटेलला झालेल्या अटकेप्रकरणी गुजरातमधील भाजप सरकार आणि पोलीस विभागाची काहीही भूमिका नाही, असेही पटेल यांनी स्पष्ट केले आहे.
गुजरातमधील भाजप सरकार हार्दिक पटेलच छळ करत असल्याचा आरोप प्रियांका गांधी वढेरा यांनी अलिकडेच केला होता. 2015 सालच्या देशद्रोहाच्या खटल्याच्या सुनावणीला उपस्थित न राहिल्यामुळे हार्दिक पटेलला काल रात्री विरामगाम तालुक्यातून अटक करण्यात आली आहे. हार्दिक पटेल जामिनाच्या शर्तींचे उल्लंघन करत असल्याचे निदर्शनास आल्यामुळे अतिरिक्त सत्र न्यायाधीश बी.जी. गणात्रा यांनी त्याच्या अटकेचे वॉरंट बजावले होते. खटला लांबवण्याच्या हेतूनेच हार्दिक पटेल सुनावणीला नियमितपने उपस्थित रहात नसल्याचे निरीक्षणही न्यायालयाने नोंदवले होते. त्याला 24 जानेवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
पाटीदार समाजाच्या आरक्षणाच्या आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या हार्दिक पटेलला यापूर्वी 25 ऑगस्ट 2015 रोजी अहमदाबादमध्ये पटेल समुदायाच्या मोर्चाच्या वेळी हिंसाचार झाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेने दाखल केलेल्या देशद्रोहाच्या प्रकरणात अटक केली होती.