सगळी सोंगं करता येतात पण पैशाचं सोंग मात्र करता येत नाही, असं एक वाक्य ऐकायला मिळतं ते शंभर टक्के सत्य आहे. स्वाभिमानाने चरितार्थ चालवण्यासाठी पैसेच कमवावे लागतात आणि तेही योग्य मार्गाने, म्हणजेच नोकरी अगर व्यवसाय प्रामाणिकपणे करूनच. पण केवळ पैसे कमवून भागत नाही तर कमावलेल्या पैशातील ठराविक रकमेची बचतही करावी लागते. अन्यथा अचानक आलेलं आजारपण, अपघात किंवा अशाच प्रकारच्या संकटात निभाव लागणं कठीण होतं.
बचत अशी करावी – आपण नोकरी करत असू तर आपण एकीकडे मासिक आणि वार्षिक खर्चाचे अंदाजपत्रक तयार करावे आणि त्याचवेळी आपल्याला दरमहा मिळणाऱ्या पगारातील पंचवीस टक्के रक्कम बचत म्हणून बाजूला काढून ठेवावी. म्हणजेच पंचाहत्तर टक्के रकमेतच मासिक खर्च भागवावा. त्या बेतानेच नियोजन करावे. आपण जर व्यवसाय करत असू तर साधारणपणे काहीशी लवचिकता ठेवून साप्ताहिक ते वार्षिक खर्चाचे नियोजन करावे आणि वार्षिक नफ्यातील साधारणतः पंचवीस टक्के रक्कम बचत म्हणून बाजूला काढून ठेवावी. घरगुती पातळीवर वीज, पाणी यांची बचत केली तर ते स्वत:च्या व देशाच्या फायद्याचेच आहे.
बचत इथं करावी – नोकरदारांनी आपल्या कंपनीतील किंवा ऑफिसमधील पतसंस्थेत दरमहा रिकरिंग स्वरूपात बचत करावी. अशी पतसंस्था नसेल तर शक्यतोवर राष्ट्रीयीकृत बॅंकांमध्ये दर महिन्याच्या पगारातून आपोआप रिकरिंग स्वरूपातील रकमेची कपात होईल, अशी सोय करावी. वर्षाच्या शेवटी ह्या रिकरिंगवर ठराविक व्याज तर मिळतेच पण आपली पतही सुधारत जाते. सोन्यातील गुंतवणूकही तोट्यात जात नाही, पण प्रत्यक्षात गोल्ड बॉंड घेणं अधिक फायदेशीर ठरेल.
बचत इथं गुंतवावी – या सर्व बचतीमधून मिळणाऱ्या पैशातून स्वत:च्या घराचं स्वप्न साकार करण्यासाठी बजेटनुसार व गरजेनुसार प्लॉट घेणं, हे अत्यंत फायदेशीर ठरतं. परंतु सदरहू प्लॉट हा बिगरशेती व निवासी प्रकारच्या भागात असावा. जागेच्या किमती कधीच कमी होत नाहीत. त्यामुळे आपल्या बचतीला खरोखरच सोनेरी फळ मिळते. परंतु झटपट श्रीमंत होण्याच्या प्रयत्नात अव्वाच्या सव्वा व्याजाचे आमिष दाखवणाऱ्या बेकायदेशीर संस्थांपासून चार हात लांब राहणं अधिक श्रेयस्कर.
कोर्टाने मिळवलेला पैसा मल्टिलेव्हल मार्केटिंगमध्ये तर चुकूनही गुंतवू नये. बचत दिनाच्या निमित्तानंच नव्हे तर शुभस्य शीघ्रम या न्यायानं लवकरात लवकर बचतीला प्रारंभ करणं, हाच बचत दिनाच्या निमित्तानं घ्यावयाचा खराखुरा बोध आहे.
– प्रा. डॉ. जगदीश सदाशिव आवटे, चंदननगर, पुणे