Harbhajan Singh Criticized on Pakistan : टी-२० वर्ल्ड कप २०२६ मधून बांगलादेशला बाहेर करण्यात आल्यानंतर आशियाई क्रिकेटमधील राजकारण तापले आहे. या प्रकरणावर भारताचा माजी फिरकीपटू हरभजन सिंगने आपली आक्रमक प्रतिक्रिया दिली आहे. “पाकिस्तान गढूळ पाण्यात मासे पकडण्याचा प्रयत्न करत होता आणि भारत विरुद्ध ‘दोन विरुद्ध एक’ (पाकिस्तान व बांगलादेश मिळून) असा खेळ खेळत होता,” अशा शब्दांत हरभजनने पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला (PCB) फटकारले आहे. नेमकं प्रकरण काय? बांगलादेशने भारतात खेळण्यास नकार दिल्यानंतर आयसीसीने त्यांना स्पर्धेतून बाद केले. यावर पाकिस्तानचे अध्यक्ष मोहसिन नक्वी यांनी बांगलादेशशी एकजूट दाखवण्यासाठी वर्ल्ड कपवर बहिष्काराची धमकी दिली होती. मात्र, रविवारी पाकिस्तानने आपला १५ सदस्यीय संघ जाहीर केल्याने त्यांची ही धमकी पोकळ ठरली आहे. नुकसान फक्त बांगलादेशचंच – हरभजन सिंग ‘पीटीआय’शी बोलताना हरभजन सिंग म्हणाला, “पाकिस्तान आधीच श्रीलंकेत खेळत आहे, मग त्यांना मध्ये पडण्याची काय गरज होती? या सर्व वादात सर्वात मोठे नुकसान हे बांगलादेशचे आणि त्यांच्या खेळाडूंचे झाले आहे. जर हा वर्ल्ड कप ऑस्ट्रेलिया किंवा इंग्लंडमध्ये असता तर बांगलादेशला फारशी संधी नव्हती, पण भारतीय खेळपट्ट्यांवर त्यांचे फिरकीपटू उलटफेर करू शकले असते. त्यांनी सुपर-८ मध्ये पोहोचण्याची संधी गमावली आहे.” हरभजन सिंगने बांगलादेशच्या टी-२० विश्वचषकातून बाहेर पडण्यावर प्रतिक्रिया दिली तणावाचे मूळ कारण काय? भारत आणि बांगलादेशमधील संबंध शेख हसीना यांनी देश सोडल्यानंतर तणावपूर्ण झाले आहेत. बांगलादेशात वाढलेल्या भारतविरोधी भावना आणि हिंदूंवर झालेल्या हल्ल्यांच्या निषेधार्थ मुस्तफिझुर रहमानला आयपीएलमधून बाहेर करण्यात आले होते. या घटनेला बांगलादेश क्रिकेट बोर्डाने (BCB) प्रतिष्ठेचा मुद्दा बनवला आणि सुरक्षेचे कारण देत भारतात खेळण्यास नकार दिला. हेही वाचा – IND vs NZ 3rd T20 : मालिका खिशात घालण्यासाठी टीम इंडिया सज्ज! तिसरा सामना कुठे फ्रीमध्ये पाहता येणार? जाणून घ्या कूटनीतिक पेच आणि आयसीसीचा पवित्रा – हरभजन सिंगच्या मते, बीसीबीने संवाद साधण्याऐवजी आक्रमक भूमिका घेऊन मोठी चूक केली. थेट ‘नाही’ म्हणण्याऐवजी त्यांनी आयसीसीशी चर्चा करायला हवी होती. पण त्यांनी तसे केले नाही. या संपूर्ण प्रकरणामुळे बांगलादेश क्रिकेटचे मोठे आर्थिक नुकसान होणार असून, त्यांच्या खेळाडूंची जागतिक लोकप्रियताही धोक्यात आली आहे. आशियाई क्रिकेटमधील हे कूटनीतिक समीकरण आता अधिक गुंतागुंतीचे झाले आहे. विशेष म्हणजे पाकिस्तानने आधी बहिष्काराची भाषा केली, पण नंतर स्वतःचा संघ जाहीर करून बांगलादेशला वाऱ्यावर सोडले.