सातारा (प्रतिनिधी) – सुशीला गणपत भालशंकर (वय 67, रा. जयश्री सोसायटी, कर्मवीरनगर, एमआयडीसी, सातारा) यांचा छळ करून नोकराप्रमाणे वागणूक दिल्याबद्दल पती गणपत आबाजी भालशंकर व सून उषा राजेंद्र भालशंकर यांच्यावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
सुशीला भालशंकर यांना अडगळीच्या खोलीत कोंडून ठेवल्याचे आणि घर नावावर न केल्यास जीवे मारण्याची धमकी दिल्याचे याबाबतच्या तक्रारीत म्हटले आहे.
पती व सून सुशीला भालशंकर यांचा बारीकसारीक गोष्टींवरून पाणउतारा करत होते. त्यांना नोकराप्रमाणे वागणूक देऊन घरातील धुणीभांडी, स्वयंपाक करायला भाग पाडत होते. त्यांना दोन वेळचे पुरेसे अन्नही दिले जात नव्हते. त्यांना शिळे अन्न खायला भाग पाडले जात होते.
त्यांना अडगळीच्या खोलीस ठेवून, आजारपणात औषधोपचार केला जात नव्हता, असे तक्रारीत म्हटले आहे. पोलीस नाईक भोसले तपास करत आहेत.