बोरी-साळवाडीतील पाच जणांवर गुन्हा दाखल
नारायणगाव – अवैध सावकारीच्या माध्यमातून दहा टक्के व्याजाने दिलेल्या पैशांसाठी 29 वर्षीय तरुणाला पळवून नेऊन पाच महिने घरात डांबून ठेवून त्याच्यावर वसुलीसाठी अमानुष छळ करणाऱ्या (रा. बोरी साळवाडी, ता. जुन्नर) येथील एका कुटुंबातील 5 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अजित बाबाजी काळे, गौतम बाबाजी काळे, बाबाजी कुंडलिक काळे, सुनंदा बाबाजी काळे, ऋतुजा अजित काळे (सर्व रा. बोरी खुर्द, साळवाडी, ता. जुन्नर) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. फिर्याद प्रवीण बबन जाधव (वय 29, रा. बोरी बुद्रुक, ता. जुन्नर) यांनी दिली आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक अर्जुन घोडे पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार साळवाडी (बोरी खुर्द) येथील गौतम काळे यांच्याकडून प्रवीण जाधव याने गुऱ्हाळ सुरू करण्यासाठी साडेचार लाख रुपये दरमहा दहा टक्के व्याजाने घेतले होते. व्याजाचे पैसे न दिल्याने काळे यांनी मुद्दल व व्याजाच्या पैशाची मागणी केली. जाधव यांच्याकडे पैसे नसल्याने काळे यांनी जमिनीचे खरेदीखत करून देण्याचा तगादा जाधव यांच्याकडे लावला होता.
जाधव काहीच प्रतिसाद देत नसल्याचे पाहून काळे याने 31 मे 2019 ला जाधवला नारायणगाव एसटी बस स्थानकातून गाडीमध्ये बळजबरीने बसवून अजीत काळे यांचे घरात 31 मे ते 28 ऑक्टोबरपर्यंत कोंडून ठेवले होते. यादरम्यान, जाधवकडून 1 लाख 15 हजार रुपये जबरदस्तीने घेऊन जीवे मारण्याची धमकी देऊन मारहाण केली.
अजित काळे यांची आई सुनंदा काळे व पत्नी ऋतुजा काळे यांनीही जाधव याचा शारीरिक-मानसिक छळ केला होता.
या घटनेची माहिती नारायणगाव पोलिसांना 28 ऑक्टोबरला कळल्याने पोलिसांनी परिसरात माहिती घेऊन सापळा रचून काळे यांच्या घराच्या वरच्या मजल्यावर छापा टाकून जाधव याची सुटका करून अजीत काळे व गौतम काळे यांना अटक केली. सहाय्यक पोलीस निरीक्षक अर्जुन घोडे पाटील, के. डी. ढमाले, एस. एमण टाव्हरे, शिंदे, दिनेश साबळे, सचिन कोबल, शैलेश वाघमारे, धनंजय पालवे या पथकाने केली.