मंचर – माहेरहून पाच लाख रुपये व्यावसायासाठी आणावेत, या कारणावरून पतीसह सासू-सासरे आणि मामेसासऱ्यांनी मानसिक आणि शारीरिक त्रास दिल्याप्रकरणी प्रियांका पोखरकर यांनी घोडेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे, अशी माहिती सहाय्यक पोलिस निरीक्षक जीवन माने यांनी दिली.
घोडेगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मार्च 2015 ते 22 सप्टेंबर 2019 दरम्यान गवारवाडी घोडेगाव येथे आणि मुंबई -परेल येथे प्रियांका ब्रम्हानंद पोखरकर (वय 27, सध्या रा. येलवाडी, ता. खेड) ही नांदत असताना पती ब्रम्हानंद श्याम पोखरकर, सासरे श्याम नथुराम पोखरकर, सासु नंदा श्याम पोखरकर (सर्व रा. गवारवाडी घोडेगाव), शांताराम मोतीराम घुले (मामेसासरे – रा. घुलेवाडी) यांनी शारीरिक, मानसिक त्रास देऊन छळ करीत माहेरहून व्यवसायासाठी पाच लाख रुपये आणण्यासाठी शिवीगाळ, मारहाण करून वैवाहिक जीवन आणि जगणे असह्य केले.
याबाबत प्रियांका पोखरकर यांनी शुक्रवारी (दि. 1) घोडेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या घटनेचा अधिक तपास सहायक फौजदार एन. एम. वायाळ करीत आहेत.