नवी दिल्ली – भाजपा संसदीय पक्षाची बैठक आज संसदभवन संकुलात झाली. भाजापा अध्यक्ष जे पी नड्डा तसेच राजनाथ सिगं, मनसुख मांडवीय, पियुष गोयल, धर्मेंद्र प्रधान यांच्या सह अनेक केंद्रीय मंत्रीही या बैठकीला उपस्थित होते. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव तसेच 9 ते 15 ऑगस्ट दरम्यान, हर घर तिरंगा मोहिमेनिमित्त होणाऱ्या कार्यक्रमांबाबत नड्डा यांनी सदस्यांशी चर्चा केली.
या काळात तिरंगा रॅली काढल्या जातील, असे संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी बैठकीनंतर बातमीदारांना सांगितले. विविध ठिकाणी आयोजित केल्या जाणाऱ्या कार्यक्रमांना पक्षाचे खासदार उपस्थित राहतील, अशी माहिती त्यांनी दिली.
सध्या सुरू असलेल्या संसदेच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान विविध मुद्यांवरून संसदेचे कामकाज वारंवार तहकूब झाले आहे. विरोधकांच्या जोरदार मागणीवरून सरकारने भाववाढीच्या मुद्यावरून चर्चेची मागणी मान्य केली आहे. त्याबरोबर कौटुंबिक न्यायालय विषयक दुरुस्ती विधेयक संसदेत मांडले जाणार आहे. त्या संदर्भातील रणनितीबाबतही या बैठकीच्यावेळी चर्चा झाल्याचे समजते आहे.