Happy Raksha Bandhan 2021 : आज रक्षाबंधन… जाणून घ्या राखी बांधण्याचा शुभ मुहूर्त

पुणे – राखीपौर्णिमा तथा रक्षाबंधन देशभरात उत्साहात साजरे केले जाते. भाऊ-बहिणीच्या अतूट नात्याचे बंधन विषद करणाऱ्या रक्षाबंधन सणाच्या पूर्वसंध्येला शहरातील बाजारपेठादेखील फुलल्या होत्या.
लहान बालकांपासून ते ज्येष्ठांपर्यंत सर्वांनाच आनंद देणारा रक्षाबंधनाचा सण देशभरात विविध नावांनी प्रसिद्ध आहे. या दिवशी बहिण भावाला ओवाळून राखी बांधते. तर पावसामुळे उधाण आलेल्या समुद्राला शांत करण्यासाठी कोळीबांधव समुद्राची पूजा करत असल्याचे मानले जाते. याशिवाय समुद्राला नारळ अर्पण करण्याची देखील प्रथा आहे. मागील वर्षी करोनामुळे रक्षाबंधन साजरे करण्यावर अधिक निर्बंध होते.
मात्र, यंदा अनलॉक झाल्याने बाजारपेठांसह रेल्वे स्थानक, एसटी स्थानक आदी ठिकाणी लगबग पाहायला मिळाली. भाऊरायासाठी आकर्षक राखी खरेदी करण्यासाठी महिलांची गर्दी झाली होती. यंदा विविध प्रकारचे मणी, लोकर, रेशीमसह ऑक्साइड, चांदी अशा विविध पर्यावरणपूरक राख्यांना अधिक मागणी असल्याचे चित्र होते.
रक्षाबंधन 2021 : राखी बांधण्यासाठी शुभ मुहूर्त
शुभ वेळ : 22 ऑगस्ट, रविवारी सकाळी 5 वाजून 50 मिनिटांपासून संध्याकाळी 6 वाजून 3 मिनिटांपर्यंत
राखी बांधण्यासाठी दुपारची वेळ उत्तम : दुपारी 1 वाजून 44 मिनिटांपासून ते 4 वाजून 23 मिनिटांपर्यंत
उजव्या हातात बांधा रक्षेचा धागा
लाडक्या भावाला राखी बांधण्यासाठी औक्षणाचं ताट सजवा. पाट ठेवून पाटाभोवती रांगोळी काढा. भावाला पाटावर बसवून त्याचं औक्षण करा. त्याच्या उजव्या हातात राखी बांधून त्याला मिठाई भरवा. तसेच त्याच्याकडून रक्षा करण्याचं वचन घ्या. राखी बांधणं म्हणजे, वैदिक पद्धतीत याला मणीबंधनाचे प्रतिक म्हणतात. त्यानंतर भाऊ स्वइच्छेने बहिणीला भेटवस्तू देतो.




