-->

राज्यातील जनतेला नवीन वर्षानिमित्त मुख्यमंत्र्यांकडून हार्दिक शुभेच्छा

"वैयक्तिक आरोग्याबरोबर इतरांच्या आरोग्याची देखील काळजी घेण्याचा संकल्प आपण करू"

मुंबई : कोरोनाला पूर्णपणे हद्दपार करण्याचा आणि त्यासाठी आपल्या वैयक्तिक आरोग्याबरोबर इतरांच्या आरोग्याची देखील काळजी घेण्याचा संकल्प आपण नव्या वर्षासाठी करूया असे सांगून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नवीन वर्षानिमित्त राज्यातील जनतेला नवीन वर्षानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.

मुख्यमंत्री आपल्या संदेशात म्हणाले, गेले वर्षभर संपूर्ण जग कोरोनाशी लढा देत आहे. महाराष्ट्राने देखील लोकांच्या सहभागाने आणि अतिशय जबाबदारीने ही लढाई लढली आहे. आज आपण विविध मार्गांनी कोरोना विषाणूचा संसर्ग काहीसा कमी करीत आणला असला, तरी येणाऱ्या वर्षात बेसावध न राहता आपली व आपल्या कुटुंबीयांच्या आरोग्याची काळजी घेणे महत्वाचे आहे. एक नवी जीवनपद्धती आपण शिकलो आहोत. यामध्ये मास्क घालणे, सुरक्षित अंतर ठेवणे, हात स्वच्छ ठेवणे यासारख्या त्रिसूत्रीचा अवलंब आपण करत आहोत.

वर्क फ्रॉम होम, ऑनलाईन शिक्षण यासारख्या बाबतीत तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त नाविन्यपूर्ण उपयोग करीत आहोत. पुढील काळ कसा असेल याचा अंदाज बांधता येणे अवघड आहे. लस आपल्यापर्यंत येईल आणि ती सर्वांना मिळेल हा एक भाग झाला. पण दरम्यान कोरोना विषाणूच्या बदलत्या रुपामुळे उद्भवलेल्या परिस्थितीचाही आपल्याला गांभीर्याने विचार करावा लागेल.

आपण पुनश्च: हरी ओम म्हणत सर्व गोष्टी टप्प्याटप्प्याने सुरु करीत आहोत. आता आपल्याला मागे परतायचे नाही. कोरोनापासून स्वातंत्र्य मिळवायचे असेल तर नियम आणि कायदे यापेक्षा आता स्वयंशिस्त पाळणे याला सर्वोच्च प्राधान्य द्यावे लागेल. विशेषत: नवीन पिढीवर याची जास्त जबादारी आहे. नव्या वर्षात आपण जबाबदार नागरिक म्हणून सर्वांच्या आरोग्याची काळजी घेण्याचा निर्धार मनोमन करणे गरजेचे आहे. आपली आव्हाने कमी होणार नाहीत. शासन यंत्रणा कृतीशील आणि गतीमान आहे.

नैसर्गिक आणि मानवनिर्मित संकटे नेहमीच येतात परंतु त्याचा सामना सावधपणे आणि शिस्तबध्द पध्दतीने करुया असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रातल्या नागरिकांना केले. सध्याच्या अव्हानात्मक परिस्थितीचा अतिश्य जिद्दीने सामना करीत असलेल्या डॉक्टर्स, परिचारीका, पोलीस, शासकीय आणि महानगरपालिका कर्मचाऱ्यांना तसेच स्वयंसेवकांना नव वर्षाच्या मनःपूर्वक शुभेच्छा.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.