बॉलीवूडमधील स्टार मदर म्हणून ओळखल्या जाणाऱ्यांमध्ये नीना गुप्तांचा उल्लेख आवर्जून होतो. अलीकडेच प्रदर्शित झालेल्या “शुभ मंगल’ या चित्रपटामध्ये नीना गुप्ता यांनी मॉडर्न आईची व्यक्तिरेखा साकारली आहे. पण त्याच वेळी रणवीर सिंहच्या “83′ या आगामी चित्रपटात नीना या कपिल देवच्या आईची व्यक्तिरेखेत दिसणार आहेत.
वयाच्या साठीमध्ये नीना गुप्तांचा हा नवा चेहरा आहे. याविषयी त्या सांगतात की, कुणी विश्वास ठेवा अगर ठेवू नका, पण मी आईच्या व्यक्तिरेखा करण्याच्या धाटणीची अद्यापही झालेली नाही. आणि तसेही आईच्या भूमिका निवडतानाही मी खूप सिलेक्टिव्ह असते.
त्यामुळेच तुम्ही जर पाहिलं असेल तर “बधाई हो’ आणि “पंगा’ या चित्रपटांपासून मला पूर्णतः वेगळ्या स्वरूपाच्या आईच्या व्यक्तिरेखा साकारायला मिळत आहेत. मला सुरुवातीपासूनच थिएटरची ओढ असल्यामुळे अशा प्रकारच्या भूमिकांना स्वीकारण्यात मला काहीही चुकीचे वाटत नाही. त्यातही आईच्या व्यक्तिरेखेला असणाऱ्या वेगवेगळ्या छटा दर्शवण्याची संधी मला मिळत आहे, याबद्दल मी स्वतःला नशीबवान समजते, असे त्या सांगतात.
“83′ या चित्रपटामध्ये नीना गुप्ता राजकुमारी निखंज यांची व्यक्तिरेखा साकारत आहेत. या आईचा चेहरा किती वेगळा आहे, हे तुम्हाला रुपेरी पडद्यावर चित्रपट पाहिल्यानंतरच समजेल असे नीना म्हणतात. नीना गुप्ता यांना मनापासून आईच्या व्यक्तिरेखा साकारायला आवडतात की नाही, हे त्याच जाणोत ! पण त्यांना एखाद्या आईप्रमाणेच खाण्याची आणि खाऊ घालण्याची मनापासून आवड आहे. घरात स्वयंपाकी असूनही त्या वेळ मिळाला की किचनमध्ये जाऊन तंदुरी गोभीपासून अरबी चाटपर्यंतचे अनेक पदार्थ तयार करून आपली मुलगी मसाबाला खाऊ घालत असतात.