जीवनगाणे : जीवनाचा सुखी प्रवास…

-अरुण गोखले

विवेक आणि विजय हे दोन मित्र. आपले गुरुकुलातील अध्ययन करून ते दोघेजण आपल्या गावाकडे परत येत होते. त्यांनी जी विद्या, जे कौशल्य, ज्ञान मिळवले, ते त्यांना आता प्रत्यक्ष जीवनात अनुभवून पाहायचे होते. त्या ज्ञानाचा, कलेचा, शिकवणीचा वापर करून त्यांचे त्यांनाच जीवन घडवायचे होते. ते सोबत जसे ज्ञानाचे गाठोडे बांधून, संस्काराची शिदोरी घेऊन चालले होते. त्यांच्या खांद्यावर मागे पुढे लटकविलेल्या दोन झोळ्या होत्या. प्रत्येकानेच त्या मागच्या पुढच्या झोळ्यांमध्ये काही ना काही तरी बांधून घेतले होते.

विवेकने आपल्या पुढच्या झोळीत जीवनातले आजवरचे आश्रमातले आनंदाचे क्षण, आठवणी, प्रसंग अनुभव साठवून ठेवले होते. तर त्या काळातील वाईट आठवणी, दु:खद आणि क्‍लेशदायक प्रसंग मागच्या झोळीत बांधून ठेवले होते. त्याने दोन झोळ्या खांद्यावर अशा पद्धतीने घेतल्या होत्या की, दु:खाची झोळी पाठीमागे तर सुखाची झोळी पुढे.

विजयने त्याची सुखाची झोळी पाठीमागे घेतली होती आणि आठवणीतल्या दु:खाचे ओझे पुढे घेऊन चालत होता.
दोघेही ठरलेला प्रवास करत असताना वाटेत एकेजागी थोडे विश्रांतीसाठी म्हणून थांबले. विजयने पाहिले की त्याच्या इतकाच प्रवास करूनही विवेक जरासुद्धा दमलेला किंवा थकलेला नव्हता. तो अजूनही उत्साही दिसत होता. त्याच्या डोळ्यात उद्याची नवी स्वप्ने दिसत होती.

तर इकडे विजय मात्र त्या खांद्यावरच्या ओझ्याने पुरता वाकून गेला होता. त्याला खूप थकवा आला होता. चालताना पायात गोळे येत होते. तो काहीसा दु:खी कष्टी झाला होता. त्याला उद्याची आशा नाही तर चिंताच वाटत होती. अखेर त्याने विवेकला त्याच्या उत्साहीपणाचे, न थकण्याचे रहस्य विचारले.

तेव्हा विवेक म्हणाला, “”मित्रा! मी सुखाची झोळी पुढे ठेवली आणि त्या सुखाकडे आनंदाच्या क्षणांकडे पाहात वाटचाल केली. मी दु:खाची झोळी मागे टाकली आणि..”
“”आणि काय?” विजयने विचारले.

त्यावेळी विवेक म्हणाला, “”मी फक्‍त इतकेच केले की, त्या दु:खाच्या झोळीला खालून एक छोटे भोक पाडले. त्यामुळे प्रवासातल्या वाटचालीत ते दु:ख गळून गेले. पाठीवरचे ओझे हलके होत गेले. त्यामुळे मी थकलो नाही इतकंच.”

ते उत्तर विजयने ऐकले. मग विजयला जीवनातला खऱ्या सुखामागचे रहस्य कळले. आपणही जुनी दुःख मागे टाकून पुढील आयुष्यात मार्गक्रमण करीत राहिले पाहिजे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.