नवी दिल्ली – करोनाच्या दुसऱ्या लाटेत शरिरातील ऑक्सिजन अचानक कमी होत असून हे जीवघेणं ठरत आहे. यासाठी हॅप्पी हायपोक्सिया मुख्य कारण ठरत असल्याचं तज्ज्ञांनी म्हटलं आहे. या आजारात रुग्णांना करोनाची लागण झाली तरी लक्षणं दिसत नाहीत. मात्र अचानक श्वासावर परिणाम होतो आणि शरिरात ऑक्सिजनची कमतरता निर्माण होते. रुग्णांसाठी हे जीवघेणं ठऱत आहे.
पीजीआयच्या कोविड १९ रुग्णालयांसह जीएमएसएच १६ आणि जीएमसीएच-३२ रुग्णालयात भर्ती होणाऱ्या, करोनाच्या गंभीर रुग्णांमध्ये हॅप्पी हायपोक्सियाचे ६० टक्क्यांहून अधिक रुग्ण आहेत. शरिरातील अचानक कमी झालेलं ऑक्सिजनचं प्रमाण रुग्णांना ब्रेन हॅमरिजसह इतर गंभीर स्थितीत पोहोचविते.
जीएमएसएच १६ चे कोविड डॉक्टर हनी साहनी म्हणाले की, हॅप्पी हायपोक्सिया रुग्ण सर्वसामान्य नागरिकांप्रमाणे मेंटेन ऑक्सिजनसह आनंदी जीवन जगतो. त्यामुळे याचं नाव हॅप्पी हायपोक्सिया ठेवण्यात आलं आहे. हॅप्पी हायपोक्सियाचा धोका आता वाढला आहे.
डॉक्टर साहनी पुढे म्हणाले की, यामध्ये करोनाबाधित रुग्णाला ताप, खोकला आणि श्वास घेण्यास अडचणी येतात. त्यानंतर अचानक ऑक्सिजनची पातळी घसरण्यास सुरुवात होते. अशावेळी ऑक्सिजन मेंटेन करणं कठीण होतं. याचा परिणाम किडनी, मेंदू आणि हृदयावर होतो.
दरम्यान हॅप्पी हायपोक्सिया हा आजार वृद्धांपेक्षा युवकांमध्ये अधिक दिसून येत आहे. युवकांची प्रतिकारशक्ती मजबूत असते, त्यामुळे हॅप्पी हायपोक्सियाचे लक्षण सुरुवातीला कळत नाहीत, मात्र अचानक ऑक्सिजनची पातळी खालावते. त्यामुळे जीवाला धोका निर्माण होतो.