वडिलांकडून कुणाला उद्योगाचा वसा मिळतो, तर कुणाला व्यवसायाचा; पण, समाजऋण जपण्याचा वारसा आपल्या मुलीला देणारे वडील एखादेच.
माजी नगरसेवक हुलगेश चलवादी यांनी आपला हा वारसा आपल्या कुटुंबातील कन्यारत्न वडगावशेरी विधानसभा मतदारसंघाच्या राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या युवती अध्यक्षा रेणुका चलवादी यांना दिला आहे. आजोबा मरिअप्पा चलवादी यांनी उद्योग व्यवसाय व सामाजिक क्षेत्रात उत्तुंग यश मिळविले. वडील हुलगेश मरिअप्पा चलवादी यांनी पुणे महानगरपालिकेत अभ्यासू नगरसेवक म्हणून उत्कृष्ट कामगिरी केली.
गेल्या दोन पिढ्या समाजऋणाचा हा वारसा जसा या कुटुंबाने जपला तसाच वडीलकीच्या नात्याने मिळालेला हा वारसा आपण केवळ वडिलांच्या संस्कारामुळेच यशस्वीरित्या जपत असल्याचे रेणुका चलवादी सांगतात. वडिलांकडून आलेल्या या बहमूल्य ठेव्यातूनच आपण समजाच्या समृद्धीत भर घालण्याचे काम निष्ठेने करीत असल्याचेही रेणुका चलवादी अगदी प्रांजळपणे सांगतात.
पुणे शहराच्याच नव्हे तर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या फायर ब्रॅंड नेत्या म्हणून तसेच अभ्यासू आणि स्त्रियांच्या प्रश्नांवर लढणाऱ्या युवा नेत्या म्हणूनही रेणुका चलवादी प्रसिद्ध आहेत. आपले वडील हुलगेश चलवादी यांच्याकडूनच राजकीय वारसा मिळाला असल्याचे तसेच घरात राजकीय वातावरण असले तरी वडिलांच्या सुसंस्कारातूनच आपली जडणघडण झाली असल्याचे त्या सांगतात.
ज्येष्ठ नेते माजी नगरसेवक म्हणून वडील हुलगेश चलवादी कार्यरत असताना त्यांची विचारसरणी राजकीय कधीच राहिली नाही. बहुजनांच्या विचारातूनच त्यांनी आपल्याला समाजऋणाचे धडे दिले. त्यामुळेच बहुजनांचे नेते असलेले शरद पवार साहेब यांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात मी काम करीत आहे बहुजन हिताय…
विचारांचा पगडा वडिलांच्या कामातूनच आपल्यावर पडला आहे. यामुळेच केवळ राजकारण नव्हे तर सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातही आपण तेवढ्याच आवडीने आणि धडाडीने कार्य करीत असल्याचे रेणुका चलवादी सांगतात. वडीलांकडून राजकीय धडे गिरवत असताना शिक्षणाचे महत्त्व त्यांनी नेहमीच सांगितले.
विशेष म्हणजे एक मुलगी म्हणून त्यांनी कधीही भेदभाव केला नाही. यामुळेच बी.ए इंग्लिश, बी.ए. पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन, एम.ए.एल.एल.बी. असा शैक्षणिक ज्ञानठेवा मला जमा करता आला, यात वडीलांची मिळालेली साथ मला महत्त्वाची वाटते. मुलगी म्हणून कमी शिक्षण, असा विचार वडीलांनी कधीच केले नाहीत त्यामुळेच उच्चशिक्षण प्राप्त करता आले.
आज, पुणे इंटरनॅशल स्कुल ऍन्ड ज्यु कॉलेज, विद्यानगर येथे व्हाईस चेअरमन या पदावर काम करण्याची संधी वडिलांनी दिली, त्यांनी दिलेल्या संधीचे सोनं करीत विविध उप्रकमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा सर्वांगिण विकास करण्यासाठी प्रयत्न असतो, यातही वडिलांचे मार्गदर्शन नेहमीच मिळते. कायद्याची पदवी असल्याने वकिली क्षेत्रातही मी उत्तमप्रकारे कार्यरत आहे. विनम्रता, कार्यकुशलता व मनमिळावू स्वभाव हे गुण माझ्याकडे वडिलांकडूनच आल्याचे रेणुका चलवादी आवर्जून सांगतात.
सुशिक्षित, प्रोफेशनल आणि सुजाण नागरिक आणि युवकांनी राजकारणात यावे, असे वडीलांचे विचार त्यातही मुलींनी कोणत्याही क्षेत्रात मागे राहू नये, यासाठी ते नेहमीच आग्रही असतात. राजकारणात सक्रिय असले
तरी केवळ राजकारण म्हणून राजकारण करू नये तसेच त्यात समाजकारणाला प्राधान्य हवे, ही वडीलांची शिकवण उपयोगी ठरत आल्याने आणि केवळ याच बळावर प्रभाग क्रमांक-1 मधून आपण दोनवेळा नगरसेवक पदाची निवडणूक लढविल्याचे आणि केवळ वडिलांची समाजकारणाची विचारधारा जपताना राजकारणाला कोठेही थारा दिला नाही, यामुळे आपला केवळ अल्पशा मतांनी पराभव झाल्याचे सांगताना रेणुका चलवादी जराही कचरत नाहीत, याउलट आपल्याकडे केवळ राजकारणाला प्राधान्य देणारी नव्हे तर वैचारीक ठेवा असलेली लोक असल्याचे त्या सांगतात.
आणि चांगल्या, ध्येयवादी विचारांचा विजय केंव्हाना केंव्हा होतोच, याविश्वासातून आज आपण समाजासाठी आणखी जोमाने काम करीत असल्याचे त्या सांगतात. माझा प्रभाग आणि परिसर शहरातील आदर्श व रोल मॉडेल करण्याचा संकल्प असून एक आदर्श व्हिजन तयार केले असल्याचे आणि यामध्ये वडीलांनी केलेल्या सूचनांचा खूप उपयोग होत असल्याचेही त्यांनी नमूद केले.
राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने आपल्याला वडगावशेरी विधानसभा मतदारसंघाची युवती अध्यक्षा या पदावर काम करण्याची संधी दिलेली असताना एक मार्गदर्शक म्हणून वडीलांचा नेहमीच आधार वाटतो. पक्ष सत्तेत नसताना आणि शहरातील पक्षाची स्थिती बिकट असताना पक्षाने ठेवलेल्या विश्वासाला तडा जाऊ न देता समर्थपणे ही जबाबदारी पेलता आली
ती केवळ वडील हुलगेश चलवादी यांच्या पाठबळामुळेच. या दोन वर्षाच्या कालावधीमध्ये विधानसभा क्षेत्रातील शेवटच्या मतदारांपर्यंत पक्षाची विचारधारा, तत्वे पोहचवत असताना तू उत्तमरीत्या काम करीत असल्याची पावती वडिलांनीच दिल्याने कामाला आणखी हुरूप येतो आहे. आपल्या ध्येयापर्यंत पोहचताना समाजऋणांचा विसर कधीही पडू देवू नकोस, हे वडील हुलगेश चलवादी यांचे वाक्य नेहमीच लक्षात असते.
जिद्द, संघर्षाचे दुसरे नाव म्हणजे माझे वडील…
माजी नगरसेवक आणि सुज्ञ व्यक्तिमत्त्व म्हणून सुपरिचीत असलेले हुलगेश चलवादी हे माझे वडील. त्यांच्या उमेदीच्या काळात त्यांची आर्थिक स्थिती बेताचीच होती. आज आदर्श नेते, संस्थाचालक म्हणून त्यांचा परिचय असताना एक चांगली व्यक्ती म्हणूनही ते समाजात परिचीत आहेत. त्यांचा जीवन प्रवास संघर्षाचा असला तरी तो माझ्यासाठी प्रेरणादायी ठरला आहे. जिद्द नव्हे तर जिद्द, संघर्ष आणि सर्जनाचे दुसरे नाव म्हणजे माझे वडील हुलगेश चलवादी. संघर्ष हाच गुरुमंत्र घेऊन त्यांची आणि त्यांनी आखून दिलेल्या पाऊल वाटेवरून माझा प्रवास सुरू आहे. शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत असताना एक ज्ञानाचे व्यासपीठ म्हणून त्यांचा उल्लेख करावा वाटतो. त्यांच्यासोबत वडील म्हणून नव्हे तर एक मार्गदर्शक, आदर्श गुरू आणि सच्चा मित्र म्हणून मला ते मोठे वाटतात.