विश्‍वासाला पात्र ठरल्याचा आनंद – पंत

नवी दिल्ली –ब्रिस्बेन कसोटीत केवळ विजय मिळवण्याच्याच उद्देशाने फलंदाजी करत होतो. सामना अनिर्णित राखण्याचा विचारही मनात आला नव्हता. संघ व्यवस्थापन, प्रशिक्षक व कर्णधार यांनी माझ्यावर दाखवलेल्या विश्‍वासाला पात्र ठरलो याचाच जास्त आनंद आहे, अशा शब्दात भारताचा यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत याने आपल्या भावना व्यक्त केल्या. 

भारतीय संघात निवड झाल्यापासून आजवर त्याला दर्जाला साजेशी कामगिरी करता आलेली नव्हती. तसेच त्याला जीतक्‍या वेळा मोक्‍याच्या क्षणी फलंदाजीसाठी पाठवण्यात आले त्यातील अनेक खेळींमध्ये त्याने अत्यंत बेजबाबदार वृत्तीचे दर्शन घडवले होते. मात्र, यंदाच्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत त्याने अनुभवी फलंदाजाप्रमाणे कामगिरी केली व त्याच्या फलंदाजीच्याच जोरावर भारतीय संघाने ब्रिस्बेन कसोटीसह मालिकाही जिंकली. या यशात पंतचे योगदान सर्वात महत्वाचे होते. त्यावर पंतने पहिल्यांदाच माध्यमांशी संवाद साधला.

कोणत्याही सामन्यात फलंदाजी करताना धावांचा पाठलाग करण्याला माझी पसंती असते. सामना अनिर्णित ठेवण्याचा विचारही मनात येत नाही. ब्रिस्बेन कसोटीबाबत बोलायचे झाले तर, सामना जिंकण्याचा प्रयत्न करा, हीच संघ व्यवस्थापनाची सुरुवातीपासूनची योजना होती. मी देखील सामना जिंकायचाच विचार करतो. मला प्रत्येक सामन्यात जिंकायचा असतो. त्या दृष्टीनेच मी खेळ खेळतो. काही वेळा अपयशाचा सामना करावा लागतो. मात्र, ब्रिस्बेन कसोटीत आमच्या योजनेनूसार माझा खेळ झाला याचा आनंद सर्वात जास्त आहे.

नाथन लॉयनच्या गोलंदाजीवर ऑस्ट्रेलियाचा कर्णधार व यष्टीरक्षक टीम पेनीने मला यष्टीचीत करण्याची संधी गमावली. खेळपट्टीवर चेंडू वळत असताना तुम्ही तो सोडत असाल, तर धोका नाही. पण तुम्ही असे चेंडू खेळण्याचे प्रयत्न केले, तर फटका चुकण्याची शक्‍यता असते. हे मला त्यावेळी लक्षात आले व त्यानंतर मात्र, मी त्या सामन्यात संपूर्ण जबाबदारीने खेळकेला व यशही मिळाले. निवड समिती, संघ व्यवस्थापन, प्रशिक्षक व कर्णधार यांनी दाखवलेल्या विश्‍वासाला पात्र ठरलो याचाच आनंद जास्त आहे, असेही पंतने सांगितले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.