मानव सेवेतून मिळणारा आनंद चिरकाल टिकतो – हजारे

पिंपरी – गाव, समाज आणि देश यासाठी जगणारी आणि मरणारी माणसे खऱ्या अर्थाने जगतात. त्याचप्रमाणे मानवसेवेतून मिळणारा आनंद चिरकाल टिकणारा असतो, असे मत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी राळेगणसिद्धी येथे गुरुवारी (दि. 18) व्यक्त केले.

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान (पिंपरी-चिंचवड विभाग) आयोजित श्‍यामची आई कृतज्ञता सोहळ्याच्या अध्यक्षीय मनोगतात ते बोलत होते. या प्रसंगी कवी भरत दौंडकर यांना “श्‍याम’ आणि त्यांच्या मातोश्री कलाबाई दौंडकर यांना “श्‍यामची आई’ सन्मान हजारे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

नारायण सुर्वे साहित्य-कला अकादमीचे अध्यक्ष सुदाम भोरे, स्वागताध्यक्ष उद्योजक रंगनाथ गोडगे पाटील आदी उपस्थित होते. या प्रसंगी प्राचार्य जी. के. औटी यांना सानेगुरूजी विचारसाधना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्याचप्रमाणे “कृष्णाकाठ’ दिवाळी अंक पारितोषिकासाठी राज्यातील विविध दिवाळी अंकामधून 5 दिवाळी अंकांची निवड करण्यात आली. त्यांना स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र प्रदान केले. “वारसा’, “शब्दचैतन्य’, “शब्दशिवार’ यांना प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकाने तर, “उद्याचा मराठवाडा’ तसेच “अधोरेखित’ या दिवाळी अंकांना उत्तेजनार्थ पारितोषिक प्रदान केले.

पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरातील 21 गुणवंत कामगारांना सन्मानित केले. स्वानंद राजपाठक यांचा करोना योद्धा म्हणून विशेष सन्मान केला. कलाबाई दौंडकर यांच्याशी महाराष्ट्र साहित्य परिषदेचे भोसरी शाखाध्यक्ष मुरलीधर साठे यांनी संवाद साधला. भरत दौंडकर यांनी “माय नव्हती अडाणी, माय नव्हती साक्षर..माझ्या जिवाच्या वहीत, तिच्या रक्ताचे अक्षर…’ ही कविता सादर करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.

कवी अनिल दीक्षित, हृदयमानव अशोक आणि सुमीत गुणवंत या कवींनी सादर केलेल्या “आई’ या विषयावरील आशयगर्भ कविता ऐकताना अण्णा हजारे यांच्यासह सर्व उपस्थितांचे डोळे पाणावले. प्रकाश घोरपडे यांनी संत तुकाराम महाराज यांच्या वेशभुषेत अण्णा हजारे यांच्या समवेत सभागृहात प्रवेश केला. संगीता झिंजुरके यांनी, “खरा तो एकची धर्म… जगाला प्रेम अर्पावे!’ या सानेगुरूजी लिखित प्रार्थनेचे सुरेल गायन केले. बाजीराव सातपुते यांनी “आईच्या संस्कारातून घडलेले सानेगुरुजी’ या विषयावर व्याख्यान सादर केले.

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचे पिंपरी-चिंचवड विभाग अध्यक्ष पुरुषोत्तम सदाफुले यांनी प्रास्ताविक केले. राजेंद्र वाघ, सुरेश कंक, अरूण इंगळे, मुकुंद आवटे, जयवंत भोसले, इंद्रजीत पाटोळे, प्रदीप गांधलीकर यांनी संयोजन केले. प्रा. दिगंबर ढोकले यांनी सूत्रसंचालन केले. अरुण गराडे यांनी
आभार मानले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.