हॅपिएस्ट माईंडसचे दणदणीत पदार्पण

मुंबई – माहिती तंत्रज्ञान (आयटी) क्षेत्रातील सेवा देणाऱ्या हॅपिएस्ट माईंडस् टेक्नॉलॉजी या कंपनीच्या शेअरचे आज बाजारात दणक्यात पदार्पण झाले. आयपीओ किंमतपट्ट्याच्या तुलनेत 111.4 टक्के अधिकचा प्रिमियम घेऊन आज या शेअरचे गुंतवणूकदारांनी स्वागत केले.

मुंबई शेअरबाजारात 351 रुपये या किंमतीला, तर राष्ट्रीय शेअर  बाजारात 350 रुपयांनी या शेअरचे व्यवहार सुरु झाले. सर्वसाधारण वर्गातील गुंतवणूकदारांना 166 रुपयांना हा शेअर मिळाला आहे. सकाळी दहा वाजता या शेअरने 384.15 रु. पर्यंत मजल मारली. काही वेळातच राष्ट्रीय शेअर बाजारात त्याचा भाव 394.95 रुपयांवर पोचला होता.

कंपनीचे अनुभवी नेतृत्व, बळकट पाया आणि डिजिटल व्यवसायावर कंपनीने दिलेला भर यामुळे स्वाभाविकच गुंतवणूकदारांना पहिल्याच दिवशी शेअरने चांगली कमाई करून दिली. कंपनीने या आपीओद्वारे बाजारातून 702 कोटी रुपये उभे केले आहेत.

कंपनीच्या आयपीओला गुंतवणूकदारांनी भरभरून प्रतिसाद दिला होता. कंपनीच्या शेअरसाठी 151 पट अधिक नोंदणी झाली होती. त्यामुळे हा या वर्षातील सर्वात यशस्वी आयपीओ म्हणता येईल. दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी कंपनीच्या प्रगतीबाबत ब्रोकर हाऊसेस सकारात्मक आहेत.

अशोक सुता हे या कंपनीचे कार्यकारी अध्यक्ष आणि संचालक आहेत. ते कंपनीचे प्रवर्तक आहेत. यापूर्वी त्यांनी विप्रोचे उपाध्यक्ष म्हणून तसेच माईंडट्री कंपनीचे संस्थापक अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून काम पाहिलेले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.