सावळ ता.( बारामती) येथील जमीन विक्री फसवणूक प्रकरणातील आरोपी निलंबित नगररचनाकार हनुमंत नाझीरकर यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी डी .पी पुजारी यांनी सुनावली आहे.
सावळ (ता. बारामती) येथील जमिन विक्री प्रकरणात दुसरीच महिला उभी करत मुखत्यारपत्राद्वारे फसवणूक केल्याच्या प्रकरणात राज्य शासनाचे निलंबित नगररचना सहसंचालक हनुमंत जगन्नाथ नाझीरकर यांना तालुका पोलिस ठाण्याकडून ताब्यात घेण्यात आले होते त्यानंतर त्यांना न्यायालयात हजर केले असता २ नोव्हेंबर पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश कोर्टाने दिले.
मार्च २०२३ मध्ये या प्रकरणाने बारामतीत मोठी खळबळ उडवून दिली होती. या प्रकरणी नाझीरकर यांच्यासह १२ जणांवर बारामती तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. त्यामध्ये नाझीरकर यांच्यासह त्यांच्या पत्नी संगीता हनुमंत नाझीरकर (रा. चतुःश्रृंगी, पुणे), राजेश भगवान लोंढे (रा. माळवाडी, हडपसर, पुणे), श्रीनिवास अरुण कवडे (रा. महंमदवाडी, पुणे), सनी लक्ष्मण चव्हाण (रा. आमराई, बारामती), सोमा देवकर, ओंकार शिंदे, राज सोनवणे, सोहेल शेख (पूर्ण नावे नाहीत, रा. बारामती) व अन्य एका अनोळखीचा समावेश होता.
या प्रकरणी अर्जून यशवंत झगडे (रा. शिर्सूफळ, ता. बारामती) यांनी फिर्याद दिली होती. या प्रकरणात ११ जणांची फसवणूक झाली होती. हनुमंत नाझिरकर यांना पुण्यातून पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यानंतर न्यायालयात हजर केले असता नाझीरकर यांचे वकील ॲड. सतीश वाघ यांनी युक्तिवाद केला. सदर गुन्ह्यातील आरोपींना यापूर्वीच कोर्टाने जमीन दिला आहे.
नाझीरकर यांचा या प्रकरणाशी संबंध नाही. त्यांच्या बँक खात्यावर कोणतेही ट्रांजेक्शन झाले नाही. उलट नाझीरकर यांचीच फसवणूक झाली आहे. राजकीय उद्देशाने नाझीरकर यांना या गुन्ह्यात अडकविले जात आहे.असा युक्तिवाद ॲड. सतीश वाघ यांनी केला. त्यानंतर कोर्टाने नाझीरकर यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.