पुणे – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी पाडवा मेळाव्यात मशिदीवरील भोंग्यांवरून घेतलेल्या भूमिकेनंतर मनसेतील मतभेद चव्हाट्यावर आले होते. पुणे शहराध्यक्ष वसंत मोरे यांनी राज ठाकरेंच्या आदेशाला बाजुला ठेवत वेगळी भूमिका घेतल्यानंतर मोरे यांना शहराध्यक्ष पदावरून हटविण्यात आलं. त्यांच्या जागी साईनाथ बाबर यांची नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर मनसेने हनुमान चालिसा लावण्यात येणारच, असा इशारा दिला आहे.
नवनियुक्त शहराध्यक्ष साईनाथ बाबर आणि इतर सहकाऱ्यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत मनसेची पुढील भूमिका स्पष्ट कऱण्यात आली.
मशिदींवरील भोंगे काढण्याचे आदेश याआधीच न्यायालयाने दिले आहेत. आता हे भोंगे काढण्याचं काम सरकारचं आहे. मात्र सरकारकडून भोंगे काढले जात नाही. सरकारने भोंगे काढले नाही, तर राज ठाकरेंनी घेतलेल्या भूमिकेप्रमाणे महाराष्ट्र नवनिर्माण सेना हनुमान चालिसा लावणारच असं मनसेच्या वतीने सांगण्यात आलं.
साईनाथ बाबर म्हणाले की, अनेक मुस्लीम राष्ट्रांमध्ये मशिदीवर भोंगे लावण्यास बंदी आहे. राज ठाकरेंनी मांडलेली भूमिका मुस्लीम समाजाला आम्ही समजावून सांगू. वसंत मोरेंना आपण भेटलो आहोत. त्यांनी सोबत काम करण्यास तयार असल्याचं म्हटलं.
दरम्यान वसंत मोरे यांचा कार्यकाळ संपला म्हणून त्यांना शहराध्यक्ष पदावरून हटविण्यात आलं आहे. मात्र राज ठाकरेंच्या भूमिकेला विरोध करणाऱ्यांवर कारवाई होणारच, असंही यावेळी मनसेच्या वतीने सांगण्यात आलं.