पिंपळे गुरवमध्ये स्पर्धा परीक्षा केंद्र ः महापालिका, दीपस्तंभचा उपक्रम
पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिका व “दीपस्तंभ’ संस्थेच्या वतीने शहरातील दिव्यांग, अनाथ आणि निराधार घटकांसाठी “मनोबल’ उपक्रमांतर्गत निवासी स्पर्धा परीक्षा केंद्र सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठी पिंपळे गुरव येथील महापालिकेच्या जुन्या शाळेची इमारत “दीपस्तंभ’ संस्थेला देण्यात येणार असून महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी नुकताच करार केला. हा उपक्रम राबविणारी पिंपरी-चिंचवड राज्यातील पहिली महापालिका ठरेल, असा दावा आयुक्तांनी केला आहे.
दिव्यांग, अनाथ, आदिवासी आणि ग्रामीण क्षेत्रातील युवक, युवतींसाठी गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि उपक्रम दीपस्तंभ बहुद्देशीय संस्थेमार्फत राबविले जातात. त्यातून अंध, अस्थिव्यंग, मूकबधिर विद्यार्थ्यांना त्यांच्या गरजांप्रमाणे मार्गदर्शक, समुपदेशक, तज्ज्ञ व्यक्ती उपलब्ध करून दिल्या जातात. तसेच अभ्यासासाठी कॉम्प्युटर, लॅपटॉप, एंजेल प्लेयर आदी तंत्रज्ञान शिकवून ते उपलब्ध करून दिले जाते. व्यक्तिमत्त्व विकास, मोबिलिटी, लाइफ स्किल्स शिकविण्यासाठी विशेष कार्यशाळांचे आयोजन केले जाते. त्या अनुषंगाने संस्थेने दिव्यांगासाठी मनोबल प्रकल्प सुरू केला आहे.
निवासी स्पर्धा परीक्षा प्रशिक्षणासाठी या प्रकारचा देशातील एकमेव प्रकल्प आहे. त्या अंतर्गत अंध, अस्थिव्यंग, कर्णबधिर आणि 16 वर्षांवरील विद्यार्थ्यांना उच्चपदासाठीच्या स्पर्धा परीक्षांचे (यूपीएससी, एमपीएससी, बॅंक, रेल्वे आदी) प्रशिक्षण दिले जाते. त्याचा लाभ राज्यासह पंजाब, उत्तरप्रदेश आदी राज्यांतील विद्यार्थी घेत आहेत.
यशोगाथा…
गेल्या वर्षी अल्पना दुबे ही विद्यार्थिनी संपूर्ण अंध असूनही यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण झाली. प्रशिक्षणानंतर आयकर विभागाची सहाय्यक आयुक्त पदावर रुजू झाली. रीना बारेला या आदिवासी विद्यार्थिनीला एक हात आणि एकच पाय आहे. तिने मंत्रालयाच्या परीक्षेत यश मिळविले आणि तेथेच उद्योग विभागात कार्यरत झाली. याशिवाय प्रांजल पाटील ही विद्यार्थिनी आयएएस परीक्षा उत्तीर्ण झाली आहे.
ही गौरवगाथा लक्षात घेऊन दीपस्तंभ संस्थेला जागा उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव स्थायी समितीच्या बैठकीत मंजूर करण्यात आला होता. त्यानुसार आयुक्तांनी दीपस्तंभ संस्थेसोबत करार केला आहे. प्रशिक्षण केंद्रासाठी आवश्यक मनुष्यबळ, प्रशिक्षक नेमण्याची जबाबदारी संस्थेची राहणार आहे.