मुंढवा-केशवनगर येथे महापालिकेकडून कारवाई
पुणे – मुंढवा-केशवनगर येथे बेकायदेशीरपणे बांधलेल्या बहुमजली इमारतीवर महापालिकेने शुक्रवारी हातोडा मारला. या कारवाईमध्ये सुमारे 17 हजार 270 चौ.फुट क्षेत्र मोकळे केले. शहर अभियंता कार्यालय, बांधकाम विकास विभाग, झोन क्रमांक-1 यांच्या वतीने ही कारवाई केली.
मुंढवा-केशवनगर येथील सर्व्हे नं. 21 मध्ये ही कारवाई करण्यात आली. कारवाई अंतर्गत इमारत क्रमांक-1 येथील सुमित भंडारी आणि इतर यांचे सुमारे 6,670 चौ.फूट, इमारत क्रमांक-2 येथील मधू पोका, पिंनी बोयना आणि इतर यांच्या अनधिकृत बांधकामावर कारवाई करून सुमारे 10,600 चौ.फूट क्षेत्र मोकळे केले. या अनधिकृत बांधकामांना महाराष्ट्र प्रादेशिक आणि नगररचना अधिनियम 1966 अंतर्गत 52-अ, व 53, (1)अन्वये दिनांक 6 जून 2019 रोजी नोटीस दिली होती.
कार्यकारी अभियंता जयवंत सरवदे यांच्या नियंत्रणाखाली उपअभियंता किरण कलशेट्टी, कनिष्ठ अभियंता विठ्ठल मुळे, दत्तात्रय चव्हाण, स्थानिक पोलीस कर्मचारी, पोलीस उपनिरीक्षक, 10 पोलीस कर्मचारी, पोलीस उपनिरीक्षक, 15 बिगारी, कटर, ब्रेकर, गॅसकटर यांच्या सहाय्याने कारवाई पूर्ण केली.