कैरो : ट्रम्प यांनी दिलेली धमकी हमासने फेटाळून लावली आहे. जोपर्यंत कायम युद्धबंदी होत नाही, तोपर्यंत इस्रायलच्या उर्वरित ओलिसांची सुटका केली जाणार नाही, याचा पुरनुच्चार देखील हमासने केला आहे. जानेवारी महिन्यात करण्यात आलेल्या युद्धबंदीच्या करारातून ट्रम्प आणि इस्रायलचे पंतप्रधान बेन्जामिन नेतान्याहू पळ काढत आहेत, असा आरोप देखील हमासने केला आहे.
या कराराद्वारे दुसऱ्या टप्प्यातील तरतूदींसाठी सुरू होणे अपेक्षित होते. या टप्प्यात उर्वरित ओलिसांची सुटका आणि बदल्यात इस्रायलच्या तुरुंगातील पॅलेस्टिनी कैद्यांचीही सुटका केली जाणे अपेक्षित आहे. याशिवाय कायम युद्धबंदी लागू केली जाणे आणि गाझा पट्ट्यातून इस्रायलच्या सर्व सैन्याने माघार घेतली जाणे देखील अपेक्षित आहे. इस्रायलच्या सर्व उर्वरित ओलिसांची सुटका करण्यासाठी दुसऱ्या टप्प्यासाठीच्या वाटाघाटी हाच एकमेव पर्याय असल्याचे हमासचा प्रवक्ता अब्देल लतिफ अल कनौआ याने म्हटले आहे.
वाटागाटीसाठीची चर्चा फेब्रुवारीच्या सुरुवातीला सुरू होणे अपेक्षित होते. मात्र आतापर्यंत या टप्प्यात फारच थोडी चर्चा होऊ शकली आहे, असेही त्याने म्हटले आहे. गुरुवारी ट्रम्प यांनी सुचटटका झालेल्या ८ माजी ओलिसांची भेट घेतली आणि हमासला निर्वाणीचा इशारा दिला होता. उर्वरित सर्व ओलिसांची सुटका आणि मृत ओलिसांच्या मृतदेहांना हस्तांतरित केले जावे. अन्यथा हमासचा सर्वनाश होईल, असे ट्रम्प यांनी म्हटले होते. अमेरिकेने थेट हमासशी चर्चा केल्याच्या वृत्ताला व्हाईट हाऊसनेही दुजोरा दिला आहे.
इस्रायल आणि हमास दोघांमध्येही त्यांच्या शत्रूंचे अवशेष आपल्याच ताब्यात ठेवण्याची प्रथा जुनी आहे. तसे केल्यामुळे ते ओलिस-कैद्यांची आदला बदल करू शकतील. हमासकडे अजूनही २४ जिवंत ओलिस असल्याचे मानले जाते, सुरुवातीच्या हल्ल्यात किंवा बंदिवासात मारल्या गेलेल्या ३४ इतरांचे मृतदेह तसेच २०१४ च्या युद्धात मारल्या गेलेल्या एका सैनिकाचे अवशेषही त्यात ठेवण्यात आले आहेत.