गावठी दारू विक्रीसाठी बाळगणाऱ्या हमालास 3 वर्षे तुरूंगवास

पुणे – गावठी दारू विक्रीसाठी बाळगणाऱ्या हमालास तीन वर्षे तुरूंगवास आणि 25 हजार रुपये दंडाची शिक्षा प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एन. के. खराडे यांनी सुनावली. निलेश गणेश कसबे (वय 22, रा. गंज पेठ) असे शिक्षा झालेल्याचे नाव आहे. दंडाची रक्कम न भरल्यास अतिरिक्त तीन महिन्यांचा कारावास भोगावा लागेल, असेही आदेशात म्हटले आहे. याबाबत राज्य उत्पादक शुल्क विभागाचे बी. ए. कांडेकर यांनी फिर्याद दिली आहे. या प्रकरणात सरकारी पक्षातर्फे सहायक सरकार वकील अनंत चौधरी यांनी काम पाहिले. त्यांनी तीन साक्षीदार तपासले. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे उपनिरीक्षक जनार्दन होले यांनी तपासी अंमलदार म्हणून काम पाहिले.

ही घटना 2 ऑगस्ट 2014 रोजी दुपारी सव्वा बाराच्या सुमारास गंज पेठ परिसरात घडली. निलेश हा गंज पेठ परिसरात आला असून त्याकडे गावठी दारू असल्याची माहिती राज्य उत्पादक शुल्क विभागाच्या पथकाला मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचत त्याला ताब्यात घेत झडती घेण्यात आली. यावेळी त्याच्याकडे तीस लिटर गावठी दारूचा एक आणि दहा लिटर गावठी दारूचे दोन कॅन आढळून आले. याप्रकरणी त्याला अटक करत त्याविरोधात मुंबई दारूबंदी अधिनियम कलम 65 (ड) अन्वये दोषारोपपत्र दाखल करण्यात आले होते.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here