मुंबई: हातातलं वैभव सोडून जर आपण विकास साधत असू तर तो आम्हला नको आहे. आम्ही आरे कारशेडच्या कामाला स्थगिती दिली आहे. आम्ही मेट्रोच्या विरोधात नाही मात्र वृक्षतोडीचा विरोधात आहोत, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले.
रातोरात झाडांची केलेली कत्तल आम्हाला मान्य नाही. मेट्रोला स्थगिती दिली नाही पण आरे कारशेडला स्थागिती दिली आहे. आरेतील झाडांचे पान सुद्धा तोडता येणार नाही. असे ठाकरे म्हणाले. आज मुख्यमंत्र्यांचा मंत्रालयातील वार्ताहर संघाने स्वागत समारंभ आयोजित केला होता. दरम्यान उद्धव ठाकरे बोलत होते.
मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर आरे कॉलनीतील मेट्रो कारशेडच्या बांधकामात अडथळा ठरणारी झाडे कापण्यात आली होती. याविरोधात नागरिकांनी व पर्यावरण प्रेमींनी मोठ्या प्रमाणात ‘आरे वाचावा’ आंदोलन केली होते. शिवसेना नेहमीच या वृक्षतोडीचा विरोधात होती. आज आरे कारशेडच्या कामाला स्थगिती देण्यात आले आहे.
यापूर्वी मुख्यमंत्री कार्यालयात पदभार स्वीकारल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संवाद साधला. जनतेने शासनावर टाकलेला विश्वास सार्थ ठरविण्यासाठी आणि महाराष्ट्राला देशात अग्रेसर करण्यासाठी विकासकामे करताना जनतेचा एकही पैसा वाया जाणार नाही याकडे अधिकाऱ्यांनी कटाक्षाने लक्ष देण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
जनतेने विश्वासाने मुख्यमंत्री पदाची जबाबदारी सोपविली आहे. राज्याला मुंबईत जन्मलेला पहिला मुख्यमंत्री मिळाला असल्याने मुंबईसह राज्याला देशात अग्रेसर करण्याचे स्वप्न घेऊन यापुढे काम करणार असल्याचे उद्धव ठाकरे म्हणले.