Fame च्या मागे नसलेला “हॉल ऑफ फेम’!

नुकतेच ICC च्या हॉल ऑफ फेम पुरस्काराची घोषणा झाली. ‘The wall’ म्हणून ओळखला जाणारा राहुल द्रविड याला हा पुरस्कार मिळाला आहे. काही व्यक्तीच अशा असतात की त्यांच्यामुळे पुरस्काराचं महत्व वाढतं. द्रविड हा त्यापैकीच एक. हा पुरस्कार मिळवणारा तो 5 वा भारतीय ठरला आहे. 2009 पासून ICCने हा पुरस्कार द्यायला सुरुवात केली. आतापर्यंत सुनील गावसकर, बिशन बेदी, कपिल देव आणि अनिल कुंबळे यांना ह्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. राहुल द्रविड ही सर्वार्थाने योग्य अशीच निवड आहे.

सभ्य लोकांचा खेळ अशी जी क्रिकेटची ओळख आहे त्याला पुरेपूर जागणारा हा खेळाडू. द्रविड हा एक तंत्रशुद्ध फलंदाज ही त्याची अर्धवट ओळख आहे. कसोटी क्रिकेट हे क्रिकेट प्रकारातील सर्वात महत्वाचं. यात द्रविडची कामगिरी तर वादातीत आहेच पण त्याचबरोबर त्याच्या नावावर असलेले विक्रम मोडू शकणारा खेळाडू सध्यातरी दृष्टीक्षेपात नाही. 210 झेल कसोटी क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर आहेत. सर्वात जास्त वेळ क्रिझवर राहण्याचा त्याचा विक्रम अजूनही अबाधित आहे. हा विक्रम हेच सांगतो की तो काय दर्जाचा फलंदाज आहे. कसोटी क्रिकेट खेळणाऱ्या प्रत्येक देशाविरुद्ध त्याने शतकी खेळ्या केल्या आहेत आणि अशी कामगिरी करणारा तो एकमेव खेळाडू आहे. कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा तो 4था खेळाडू. द्रविडचं महत्व भारतीय संघात खूप वरती आहे. द्रविड त्याचा खेळ हा कठीण परिस्थितीत नेहमीच उंचावतो अशी त्याची ख्याती. इंग्लंड, ऑस्ट्रेलिया हे कसोटी क्रिकेटमधील दादा संघ. ह्याच संघांच्या विरुद्ध द्रविडची कामगिरी उत्कृष्ट राहिली आहे, भारतात आणि विदेशात देखील.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

संघाला गरज असताना द्रविडने नेहमीच जबाबदाऱ्या स्वीकारल्या आहेत. विकेट किपर हा म्हणला तर भारतीय संघाचा तसा कच्चा दुवा नेहमीच राहिला आहे. द्रविडने गरज असताना ही जबाबदारी नुसती स्वीकारली नाही तर तिथेही स्वतःची छाप पाडली. एका मुलाखतीत त्याने सांगितलं की फलंदाज म्हणून मला विकेट किपिंगचा फायदाच झाला. त्याचं खेळावरचं प्रेमच यातून दिसतं. विकेट किपर नसताना द्रविडची जागा म्हणजे first sleep. अनेक अवघड झेल या जागेवर द्रविडने टिपले आहेत. अनिल कुंबळे गोलंदाजी करत असताना या जागेसाठी त्याची पसंती नेहमीच द्रविडला असायची. त्याच्या खेळाचे असे अनेक पैलू आहेत. कप्तान म्हणूनही त्याची कामगिरी अशीच भरीव राहिलेली आहे. वेस्ट इंडिज आणि इंग्लंडमध्ये द्रविडची कप्तानगिरी अविस्मरणीय राहिली आहे. या दोन देशांमध्ये कसोटी मालिका जिंकण्याची किमया राहुलच्या टीमने करून दाखवली. राहुलची कसोटीतील सरासरी ही 52 ची आहे. ही कामगिरीच बोलकी आहे. द्रविड हा फक्त कसोटी खेळाडू आहे अशी त्याच्यावर टीका होत असताना त्याने एकदिवसीय प्रकारात देखील स्वतःला सिद्ध करून दाखवलं. इतर फलंदाज जिथं नांग्या टाकायचे तिथं द्रविड जोमाने खेळायचा. एकदिवसीय क्रिकेटमधली एकमेव त्रिशतकी भागीदारी ही सचिन आणि द्रविडमध्येच झाली आहे. आपल्या खेळाने टिकाकारांची तोंडं राहुलने गप्प केली. द्रविडच्या कारकिर्दीतील महत्वाची मालिका म्हणजे ऑस्ट्रेलियाचा भारत दौरा. फायनल फ्रंटियर म्हणून ओळखण्यात आलेली ही मालिका भारतीय क्रिकेटच्या इतिहासात खूप महत्त्वाची आहे. ऑस्ट्रेलियाचा चौफेर उधळणारा वारू भारताने रोखला आणि ह्या विजयाचे शिल्पकार होते लक्ष्मण, द्रविड आणि हरभजन सिंग. फॉलो ऑन घेऊन कसोटी जिंकण्याची किमया करण्यात द्रविडचा सिंहाचा वाटा होता.

मॅच फिक्‍सिंगची कीड भारतीय क्रिकेटला लागली असताना द्रविडसारख्या खेळाडूंमुळे लोकांचा विश्वास क्रिकेटवर टिकून राहिला. प्रचंड मोठी कामगिरी करून, अनेकविध पुरस्कार मिळवून देखील अत्यंत साधा असणारा हा खेळाडू दुर्मिळ असाच आहे. 19 वर्षाखालील भारतीय संघाने विश्वकप जिंकला. त्यावेळी संघाचा प्रशिक्षक द्रविडच होता. त्यानंतर बक्षिसाची रक्कम सर्वांना समान असायला हवी असा आग्रह त्याने धरला. क्रिकेट हा सांघिक खेळ आहे आणि कुठल्याही विजयाचं श्रेय हे सर्वांनाच मिळायला हवं हे त्याचं मत तो माणूस म्हणून किती मोठा आहे हेच दाखवतं. बंगळुरू इथल्या विद्यापीठाने मानद डॉक्‍टरेट दिली असताना त्याने ती नम्रपणे नाकारली. माझ्या आईने डॉक्‍टरेट मिळवण्यासाठी केलेला अभ्यास आणि मेहनत मी पाहिली आहे. तितकी मेहनत केल्यावरच माझा त्यावर हक्क होऊ शकतो असं सांगून त्याने सर्वांची मन जिंकली.

भारतीय संघात “जॅमी’ या टोपण नावाने ओळखला जाणारा द्रविड हा नेहमीच प्रसिद्धीपासून दूर राहिला आहे. अनेक मानाचे पुरस्कार त्याला मिळाले आहेत आणि ‘हॉल ऑफ फेम’साठी त्याची झालेली निवड ही आपल्या सर्वांसाठी नक्कीच अभिमानाची बाब आहे. त्यासाठी त्याचं कौतुक करावं तितकं थोडं आहे.

– अमोल कुलकर्णी

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)