पिंपरी -पिंपरी-चिंचवडच्या राजकारणातील “मॅन ऑफ कमिटमेंट’ म्हणजे आमदार महेश लांडगे आहेत.त्यांनी खऱ्या अर्थाने समाविष्ट गावांच्या विकासाला चालना दिली. पिंपरी-चिंचवड शहराला स्पोर्टस सिटी करणारे आमदार लांडगे असे एकमेव नेते आहेत, अशी भावना भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी व्यक्त केली.
इंद्रायणीनगर येथे आमदार लांडगे यांच्या वाढदिवसानिमित्त राजर्षी शाहू महाराज प्रतिष्ठाणचे संस्थापक योगेश लोंढे व नगरसेविका नम्रता लोंढे यांच्यातर्फे क्रांतीनाना मळेगावकर प्रस्तुत न्यू होम मिनिस्टर या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्यावेळी त्या बोलत होत्या.
यावेळी भाजपा नेत्या चित्रा वाघ, भाजपा ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष योगेश टिळेकर, माजी महापौर राहुल जाधव, माजी नगरसेवक सुरेश म्हेत्रे, वसंत लोंढे, शिवांजली सखी मंचच्या अध्यक्षा पूजा लांडगे, नगरसेविका सारिका लांडगे, सोनाली गव्हाणे, स्विनल म्हेत्रे, अश्विनी जाधव, साधना मळेकर, निलेश बोराटे, भाऊ रासकर, प्रदीप तापकीर, कार्तिक लांडगे, दत्ता गव्हाणे आदी उपस्थित होते.
चित्रा वाघ म्हणाल्या, राज्यात सध्या दोन नंबरी सरकार आहे. राज्याच्या इतिहासात पहिल्यांदा एखाद्या गृहमंत्र्याला भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली राजीनामा द्यावा लागला आहे. रोज अत्याचार वाढले आहेत. कायदा आणि सुव्यवस्थेची लक्तरे निघाली आहेत. त्यामुळे महिलांनी आपले रक्षण स्वत:च करावे. महाराष्ट्राची इतकी वाईट परिस्थिती या सरकारने केली आहे, की छत्रपती शिवाजी महाराज यांनी या सरकारचा कडेलोट केला असता.
आमदार लांडगे म्हणाले, इंद्रायणीनगर परिसरातील लोकांच्या मदतीसाठी सतत धडपणारे नगरसेविका नम्रता लोंढे आणि योगेश लोंढे यांचे कार्य उल्लेखनीय आहे. कोविड काळात प्रत्येक समस्येला धावून जाणारे हे लोंढे दांम्पत्य आहे. वैकुंठरथाच्या निमित्ताने आणखी एक चांगला उपक्रम त्यांनी हाती घेतला आहे. त्यामुळे मी केलेली निवड सार्थ आहे, असा विश्वास आणि अभिमान वाटतो.