मुंबई : करोना उपचारासाठी आवश्यक असलेल्या पीपीई किट व एन 95 मास्कचे उत्पादन व विक्री करण्यापूर्वी हाफकिन बायोफार्मास्युटिकल महामंडळाकडून त्यांचा दर्जा व गुणवत्ता प्रमाणित करून घेणे आवश्यक आहे, असे निर्देश राज्य शासनाने दिले आहे. दर्जा व गुणवत्तेबाबतच्या मानकाव्यतिरिक्त इतर साहित्य वापरून तयार केलेल्या किट व मास्कची विक्री ही अनधिकृत समजण्यात येणार असून अशा किट व मास्कची विक्री करणाऱ्यांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचेही अधिसूचनेद्वारे जाहीर करण्यात आले आहे.
करोना रुग्णांवर उपचार करणाऱ्या आरोग्य सेवेतील वैद्यकीय अधिकारी, परिचारिका, निमवैद्यकीय कर्मचारी यांना प्रादुर्भावापासून रोखण्यासाठी पीपीई किट व एन 95 मास्क आवश्यक असते. त्यामुळे केंद्र शासनाने पीपीई किट व मास्क यांना औषधे म्हणून अधिसूचित केले आहे. किट व मास्कचा तुटवडा पाहून अनेक उत्पादकांनी पीपीई किट व एन 95 मास्कचे उत्पादन सुरू आहे. मात्र, या किट व मास्कचा दर्जा व गुणवत्ता ही ठरविलेल्या मानकानुसार नसल्यास आरोग्य सेवा देणाऱ्या अधिकारी कर्मचारी यांना प्रादुर्भावास सामोरे जावे लागते. त्यामुळे राज्य शासनाने हे साहित्य प्रमाणित असावे, यासाठी आदेश निर्गमित केले आहे.
तसेच राज्यातील या साहित्याची कमतरता लक्षात घेऊन अनावश्यक साठेबाजी करण्यास प्रतिबंध करण्यासाठी प्रमाणित पीपीई किट व एन 95 मास्कची विक्री व वितरण फक्त राज्य शासनाच्या मान्यतेने व शासनाने ठरवून दिलेल्या दराने राज्य शासनास अथवा हे साहित्य खरेदीस परवानगी दिलेल्या संस्थेस करण्याचे निर्देशही यामध्ये देण्यात आले आहेत.