विज्ञानविश्‍व: निम्मा वाटा निसर्गाचा

डॉ. मेघश्री दळवी

ग्लोबल वॉर्मिंगमुळे होणाऱ्या हवामान बदलाच्या मोठ्या धोक्‍याचा सामना आपण गेली काही वर्षे करतो आहोत. त्यासोबत पटकन न जाणवणारा आणखी एक धोका आहे तो जैवविविधता नष्ट होण्याचा. अनेक प्रकारच्या वनस्पती, शैवाल, बुरशी, सूक्ष्मजीव, कीटक, पक्षी, जलचर, सरपटणारे आणि इतर प्रकारचे प्राणी यांच्या आपापल्या अन्नसाखळ्या असतात. या सर्वांची मिळून एक संतुलित परिसंस्था (इकोसिस्टम) राखण्याचा निसर्गाचा प्रयत्न असतो. या परिसंस्थेचा नैसर्गिक समतोल सांभाळण्यासाठी जैवविविधता अत्यंत आवश्‍यक आहे. विविध प्रकारचे कीटक विविध प्रकारच्या रोपांचं परागण करतात. यातले काही कीटक नाहीसे झाले तर त्या रोपांवर गदा येते. दुसरीकडे ठराविक पक्षी ठराविक प्रकारच्या झाडांवर घरटी करतात. झाडांचा अनियंत्रित विनाश होत गेला तर जोडीने त्या पक्ष्यांना धोका ठरलेलाच.

वनस्पती, प्राणी, पक्षी यांच्या काही प्रजाती नैसर्गिकरित्या हळूहळू नामशेष होत जातात हा झाला उत्क्रांतीचा भाग. पण माणसाच्या हातून जवळजवळ हजार पटींनी वेगाने प्रजाती नष्ट होत आहेत आणि त्यांचे परिणाम आज प्रखरतेने जाणवत आहेत. एडवर्ड ओ विल्सन हे प्रख्यात उत्क्रांती आणि जैवविविधता तज्ज्ञ वेळोवेळी याकडे लक्ष वेधत आहेत आणि त्यांनीच यावर उपाय सुचवला आहे- हाफ अर्थ. म्हणजेच पृथ्वीवरील जमीन आणि समुद्र यांच्यातला निम्मा वाटा निसर्गासाठी राखून ठेवायचा आणि फक्‍त उरलेला निम्मा भाग माणसाने वापरायचा.

एडवर्ड ओ विल्सन यांचं हाफ अर्थ हे पुस्तक 2016 साली प्रसिद्ध झालं. त्याच सुमारास सुरू झालेल्या या प्रकल्पात अनेक वेगवेगळ्या स्तरांवर संशोधन होत आहे. जगाच्या पाठीवर सुमारे एक कोटी प्रजाती आहेत. मात्र, त्यातल्या फक्‍त दहा टक्‍क्‍यांचं दस्तऐवजीकरण झालं आहे. तेव्हा आधी ही नोंदींचं काम आणि मग जैवविविधतेचं संवर्धन करण्यासाठी निरनिराळे उपक्रम इथे हाती घेतलेले आहेत. विविध विद्यापीठं, संशोधन संस्था आणि काही खासगी कंपन्याही यात सहभागी होत आहेत.

या प्रकल्पात जैवविविधता जतन करण्यासाठी दक्षिण अमेरिकेत काही परिसर निश्‍चित केला आहे. तिथे संवर्धनासाठी काही मॉडेल्स तयार करून वेगवेगळे प्रयोग होत आहेत. सोबत ही माहिती सर्वांपर्यंत पोहोचवण्याचं काम अनेक स्वयंसेवक करत आहेत. दरवर्षी 7 ऑक्‍टोबरला युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया, बर्कले इथे हाफ अर्थ डे साजरा होतो. या प्रकल्पात सहभागी होणारे नामवंत पर्यावरण तज्ज्ञ आणि जैवविविधता संशोधक हे आपल्या कामाचा आढावा घेऊन पुढील वर्षाची उद्दिष्टं निश्‍चित करतात.

निम्मा वाटा निसर्गासाठी राखून ठेवला तर 85 टक्‍के प्रजाती सुरक्षितपणे जतन होऊ शकतात. पण या दिशेने विचार करायला आता कुठे सुरुवात झाली आहे. या प्रजाती वाचवायच्या असतील, तर असे अनेक प्रकल्प तातडीने हाती घेणे आवश्‍यक आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.