12 हजारपैकी सहा हजार 469 मतदार क्रियाशील : प्रारूप मतदार यादी जाहीर
श्रीगोंदा – जगताप (कुकडी) सहकारी साखर कारखान्याची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध झाली असून, कारखान्याच्या 12 हजार 161 सभासदांपैकी सहा हजार 469 सभासद मतदानास पात्र ठरले आहेत. तसेच पाच हजार 692 सभासदांचा समावेश अक्रियाशील सदस्यांच्या यादीत करण्यात आला आहे. सेवा संस्था मतदारसंघात फक्त पाच संस्था क्रियाशील ठरल्या आहेत. 1 फेब्रुवारी पर्यंत प्रारूप मतदार यादीवर हरकती घेता येणार आहेत.
तालुक्यातील दोन्ही सहकारी साखर कारखान्यांची निवडणूक होऊ घातली आहे. नागवडे कारखान्याच्या निवडणुकीत क्रियाशील आणि अक्रियाशील सभासदांच्या वादावरून निवडणुकीचा ज्वर चांगलाच चढला आहे. आता जगताप कारखान्याची प्रारूप मतदारयादी प्रसिद्ध झाली आहे. कारखान्याच्या 12 हजार 161 सभासदांपैकी सहा हजार 469 सभासद मतदानास पात्र ठरले असून, पाच हजार 692 सभासदांचा समावेश अक्रियाशील यादीत करण्यात आला आहे. सेवा संस्था मतदारसंघात फक्त पाच संस्था क्रियाशील ठरल्या आहेत.
नागवडे कारखान्याच्या निवडणुकीत सर्व सभासदांना मतदानाचा अधिकार देण्याची मागणी होत असताना जगताप कारखान्याने देखील जवळपास निम्म्या सभासदांना अपात्र ठरवले आहे. त्यामुळे आता जगताप कारखान्याच्या निवडणुकीत देखील रंगत निर्माण होणार की काय, याबाबत उत्सुकता वाढली आहे. या प्रारूप यादीवर हरकती घेण्यास 1 फेब्रुवारीपर्यंत मुदत देण्यात आली आहे. जगताप कारखान्याची अंतिम मतदारयादी 17 फेब्रुवारी रोजी प्रसिद्ध होणार आहे.
जगताप कारखान्याची निवडणूक बिनविरोध होणार, अशी चर्चा रंगत असतानाच जिल्हा बॅंकेचे संचालक दत्तात्रय पानसरे यांनी आपला मोर्चा नागवडे कारखान्याकडून आता जगताप कारखान्याकडे वळवला आहे. पानसरे यांना पाचपुते आणि नागवडे गटाकडून मदत होणार का? यावर समीकरण अवलंबून आहे. कारखान्याचे अध्यक्ष माजी आमदार राहुल जगताप यांना मागच्या निवडणुकीत विरोधात असणाऱ्या घनश्याम शेलार यांची यावेळी मात्र साथ लाभणार आहे.
प्रणोती जगताप रिंगणात उतरणार?
सेवा संस्था मतदारसंघात पाच संस्था पात्र ठरल्या आहेत. यामध्ये रेणुकामाता सेवा संस्थेचा ठराव कारखान्याचे अध्यक्ष राहुल जगताप यांच्या पत्नी प्रणोती जगताप यांच्या नावाचा आहे. त्यामुळे कारखान्याच्या निवडणुकीत सेवा संस्था मतदारसंघात उमेदवारी करीत प्रणोती जगताप सक्रिय राजकारणाचा श्रीगणेशा करणार का? अशी चर्चा रंगली आहे.