मुंबई – मुंबईतील निम्म्या मुलांना करोना होऊन गेल्याचे निष्पन्न झाले आहे. मुंबईतील सेरो सर्व्हेमध्ये 50 टक्क्यांहून अधिक लहान बालकांमध्ये करोनाच्या अँटीबॉडीज सापडल्या आहेत. यासोबतच याआधी करण्यात आलेल्या सर्व्हेपेक्षा आत्ताच्या सेरो सर्व्हेमध्ये मुंबईतल्या लहान मुलांमध्ये करोना अँटिबॉडीज सापडण्याचे प्रमाण वाढल्याचे स्पष्ट झाले आहे.
महापालिकेच्या नायर रुग्णालय आणि कस्तुरबा मोलेक्युलर डायग्नोस्टिक्स लॅबोरेटरी यांच्यामार्फत हा सर्व्हे करण्यात आला. पालिका आयुक्त इक्बालसिंह चहल आणि पालिका अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दुसऱ्या लाटेदरम्यानच हा सेरो सर्व्हे करण्याचे आदेश दिले होते. 1 एप्रिल 2021 ते 15 जून 2021 दरम्यान हा सर्वे करण्यात आला आहे.
या सेरो सर्व्हेसाठी मुंबईच्या सर्व 24 वॉर्डमध्ये मिळून एकूण 2 हजार 176 नमुने गोळा करण्यात आले. यासाठी आपली चिकित्सा नेटवर्क आणि पालिकेच्या नायर हॉस्पिटलमधून 1 हजार 283 तर 893 नमुने हे दोन खासगी प्रयोगशाळांमधून गोळा करण्यात आले आहेत.
पेडियाट्रिक श्रेणीमध्ये येणाऱ्या सर्व वयोगटातील मुलांमध्ये सरासरी सेरो पॉझिटिव्हिटी रेट तब्बल 51.18 टक्के इतका आढळून आला. त्यापैकी सार्वजनिक क्षेत्रातील प्रमाण 54.36 टक्के तर खासगी क्षेत्रातील मुलांचं प्रमाण 47.03 टक्के इतकं नोंदवण्यात आलं आहे.
दरम्यान, या सर्व्हेसाठी 1 ते 18 वयोगटातील मुलांचे नमुने तपासण्यात आले. यामध्ये 1 ते 4 वयोगटामध्ये 51.04 टक्के, 5 ते 9 वयगटामध्ये 47.33 टक्के, 10 ते 14 वयोगटामध्ये 53.43 टक्के आणि 15 ते 18 वयोगटामध्ये 51.39 टक्के सेरो पॉझिटिव्हिटी रेट आढळून आला आहे. 10 ते 14 या वयोगटामध्ये सर्वाधिक सेरो पॉझिटिव्हिटी रेट आढळून आला आहे.
दरम्यान, या सर्व्हेमधून गेल्या वेळच्या तुलनेत यंदा सेरो पॉझिटिव्हिटी रेट वाढल्याचं समोर आलं आहे. याआधी मार्च महिन्यामध्ये तिसरा सेरो सर्व्हे करण्यात आला होता. त्यामध्ये 1 ते 18 वयोगटातील लोकसंख्येमध्ये सेरो पॉझिटिव्हिटी रेट 39.4 टक्के इतका होता. आता तो 50 टक्क्यांच्याही वर गेला आहे.