28 हजार 725 उमदेवारांकडून नोंदणी; प्रत्यक्ष 15 हजार जणांकडून परीक्षा
पुणे – शहरासह देशात रविवारी केंद्रीय लोकसेवा आयोगाची (यूपीएससी) पूर्वपरीक्षा झाली. यंदा पुण्यात करोना संकट लक्षात घेता जवळपास 13 हजार उमेदवारांनी ही परीक्षा दिली नसल्याचे स्पष्ट होत आहे. पुण्यात 72 केंद्रांवर ही परीक्षा झाली. त्यासाठी 28 हजार 725 उमदेवारांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. त्यापैकी 15 हजार उमेदवारांनी प्रत्यक्ष परीक्षा दिल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली.
करोना प्रादुर्भावामुळे पुढे ढकललेली यूपीएससीची पूर्वपरीक्षा अखेर रविवारी सुरळीतपणे पार पडली.
पुण्यात पहिल्या सत्रात 15 हजार 352 उमेदवार, तर दुपारच्या सत्रात 15 हजार 286 उमदेवारांनी परीक्षा दिली. यावरून यंदा जवळपास 13 हजार उमेदवारांनी ही परीक्षा दिलेली नाही. दरवर्षी सुमारे 90 टक्के उमेदवार परीक्षा देतात. यावर्षी ही अनुपस्थित उमेदवारांची संख्या तुलनेते जास्त असल्याचे दिसून येत आहे. करोना संकटात जास्त जोखीम नको म्हणून काही उमेदवारांनी परीक्षा न देण्याचा निर्णय घेतला.
नियोजित वेळापत्रकानुसार यूपीएससीची परीक्षा 31 मे 2020 रोजी होणार होती. मात्र, मार्च अखेरपासून करोना पार्श्वभूमीवर टाळेबंदी लागू केली. त्यामुळे ही परीक्षा 4 ऑक्टोबर रोजी घेण्याचा निर्णय यूपीएससीने घेतला. त्यानंतरही अद्याप करोनाचे संकट कायम असून, ही परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी होत होती. अखेर सर्वोच्च न्यायालयाने परीक्षा वेळेत घेण्याचे निर्देश दिल्यानंतर रविवारी ही परीक्षा घेण्यात आली. देशभरातील 72 शहरांमध्ये 2 हजार 569 परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा झाली. यासाठी सुमारे 10 लाख उमेदवारांनी नोंदणी केली होती.
करोनावरील लस, खासदारांचे वेतन व भत्त्यात केलेल्या कपातीवरील विधेयक अशा अलीकडच्या प्रश्नांचा परीक्षेत समावेश होता. यूपीएससीची पूर्व परीक्षा यंदा तुलनेने अवघड होती.
– स्वप्निल काशिद, बारामती, उमेदवार