बाधित सापडण्याचे प्रमाण तब्बल 48.20%
पुणे – राज्यात करोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत आहे. मात्र, या आठवड्यात बाधित सापडण्याच्या प्रमाणामध्ये पुणे जिल्ह्याचा 9 वा क्रमांक लागतो. तर औरंगाबाद जिल्ह्याचा पहिला क्रमांक लागतो. औरंगाबादमध्ये हे प्रमाण 48.20 टक्के इतके असून, पुण्यात त्याची सरासरी 24.60 टक्के आहे.
आरोग्य विभागाने राज्याचा आठवड्यातील पॉझिटिव्हिटी दर काढला आहे. त्याची तुलना करता त्यामध्ये सर्वाधिक बाधित जिल्ह्यात औरंगाबाद तर सर्वात कमी अहमदनगर जिल्ह्याचा क्रमांक लागतो. दरम्यान, राज्याचा आठवड्याचा पॉझिटिव्हिटी दर हा 21.52 टक्के इतका आहे. राज्याच्या पॉझिटिव्हिटी दरापेक्षा दहा जिल्ह्यांचा दर हा अधिक आहे. पुण्यात सर्वाधिक रुग्णसंख्या आढळत असली, तरी पॉझिटिव्हिटी दर हा इतर जिल्ह्यांच्या तुलनेत कमी असल्याचे आकडेवारीतून समोर आले.
रुग्णवाढीत नांदेड अव्वल
राज्यात आता रुग्णवाढीच्या दरामध्ये नांदेड जिल्ह्याचा पहिला क्रमांक लागल्याचे आकडेवारीतून दिसत आहे. नांदेड जिल्ह्यात 3.29 टक्के, तर नंदूरबारमध्ये 3.4 टक्के, अकोला- 2.77 टक्के असा रुग्णवाढीचा दर आहे. पुणे जिल्ह्यात 1.11 टक्के एवढा रुग्णवाढीचा आठवड्यातील दर आहे.
राज्यात सर्वाधिक कमी म्हणजे 0.13 टक्के रुग्णवाढीचा दर हा कोल्हापूर जिल्ह्याचा आहे. गडचिरोली, सातारा, गोंदिया, पालघर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, सांगली, रायगड, सोलापूर आदी जिल्ह्यांचा दर कमी आहे, अशी माहिती या अहवालातून देण्यात आली.